अवतीभवती
--
डॉ. आशिष रानडे
यांचे रविवारी गायन
नाशिक : महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखा व विश्वास ग्रुप आयोजित सूर विश्वास मैफलीचे ६२वे पुष्प शास्त्रीय गायक डॉ. आशिष रानडे रविवारी (ता. १७) गुंफणार आहेत. सावरकरनगरजवळील विश्वास गार्डनमध्ये सकाळी सातला मैफल रंगणार असून, सुजित काळे (तबला), अथर्व भागवत (संवादिनी) साथसंगत करतील.
-------
डॉ. गोविलकर यांचे
उद्या व्याख्यान
नाशिक : सार्वजनिक वाचनालयातर्फे अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. विनायक गोविलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सोमवारी (ता. १८) करण्यात आले आहे. ‘युद्ध फक्त सीमेवर नसते’ विषयावर गोविलकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी साडेसहाला व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके असतील.
-------
डॉ. दीपक पवार यांचे
बुधवारी व्याख्यान
नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे १४९वे पुष्प मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार गुंफणार आहेत. बुधवारी (ता. २०) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी सहाला व्याख्यान होईल. शिवाजी कोण होता? पुस्तकावर ‘कोण शिवप्रेमी..? कोण शिवद्रोही..?’ या विषयावर डॉ. पवार आपले विचार मांडणार आहेत. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांचे संयोजन आहे.
---------
शाहिरी पुरस्काराने
केदार कुटुंबीय सन्मानित
नाशिक : जलसेकार सोनु रावजी केदार यांनी आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करण्यात योगदान दिले होते. २०१३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान लक्षात घेत कल्याण- डोंबिवली महापालिकेतील बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेतर्फे त्यांना मरणोत्तर ‘आंबेडकरी शाहीर पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रा. गंगाधर अहिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. केदार यांच्या पत्नी हिराबाई यांच्यासह कन्या शशीकला हिरे व मुलगा शरद सोनू केदार यांनी पुरस्कार स्विकारला. रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
------