प्रलंबित तीन हजार ७६२ खटले निकाली
राष्ट्रीय लोकअदालतीत ६४ कोटींचे तडजोड शुल्क वसूल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : येथील नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्ह्यात नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीत जिल्ह्यातील एकूण तीन हजार ७६२ प्रकरणे निकाली काढली असून, सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ६४ कोटी नऊ लाख ४१ हजार ८४७ रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.
याबाबत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतीश हिवाळे यांनी माहिती दिली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालत पार पडली. लोकअदालतीमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील तालुका न्यायालयात एकूण ४९ पॅनेलची व्यवस्था केली होती. सर्व पॅनेलप्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज केले. दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ३९ हजार ५९८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी दोन हजार २१४ प्रकरणे निकाली निघाली असून, रक्कम रुपये तीन कोटी १५ लाख ६४ हजार ४७८ इतकी वसुली झाली. अशा प्रकारे न्यायालयातील प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणे मिळून एकूण तीन हजार ७६२ प्रकरणांचा निपटारा होऊन एकूण रुपये ६४ कोटी नऊ लाख ४१ हजार ८४७ रुपये शुल्क झाले. या रकमेत तडजोड रक्कम समाविष्ट आहे.
नाशिक रोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण दोन हजार ४८७ मोटार वाहन प्रकरणांमध्ये ३५४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.
ही प्रकरणे निकाली निघाली
-परक्राम्य संलेख अधिनियमांतर्गतची प्रकरणे : ४७३
-मोटार अपघात प्रकरणे : १५६
-कामगारविषयक : १
-कौटुंबिक वादातील प्रकरणे : ३२
-फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे : २००
-इतर : २,९००
NSK26H19274
नाशिक : राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी नागरिक.