भुसावळात हॉटेल मालकावर
ग्राहकांचा लोखंडी रॉडने हल्ला
----
बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १५ : मटकीची उसळ खराब असल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना भुसावळ शहरातील भोळे पेट्रोलपंपाजवळील हॉटेल देवयानी येथे गुरुवारी (ता.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी साहील तडवी व त्याच्या दोन ते तीन साथीदारांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हर्षल बाळू पाटील (वय ४१ वर्षे, रा. देनानगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. ते भोळे पेट्रोलपंपाजवळ हॉटेल देवयानी नावाचे हॉटेल चालवितात. फिर्यादीनुसार बुधवारी (ता.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास साहील तडवी व त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी मटकीची उसळ मागविली होती. सुमारे तासाभरानंतर उसळ कडू लागत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यावर हॉटेलमालकाने वेळेत सांगितले असते, तर उसळ बदलून दिली असती, असे सांगितल्याने संशयितांनी शिवीगाळ केली व बिल भरून रात्री नऊला तेथून निघून गेले. त्यानंतर रात्री सव्वादहाच्या सुमारास साहील तडवी व त्याच्यासोबत दोन ते तीन इसम पुन्हा हॉटेलवर आले. त्यांनी संगनमत करून हर्षल पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साहील तडवी याने लोखंडी रॉडने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेले अर्जुन दौलतसिंग धुर्वे यांनाही संशयितांनी मारहाण केली. मोबाइलमध्ये व्हिडीओ का काढत आहे?, असे म्हणत त्यांचा मोबाइल हिसकावून जमिनीवर आपटून फोडण्यात आला. शिवाय चापटाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूसारखी वस्तू दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना पोलिसांनी ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी पाठविले होते. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस करीत आहेत.