कृत्रिम रसायनांचा वापर
केल्यास फौजदारी कारवाई
--
जिल्हा उपनिबंधकांचा व्यापाऱ्यांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ : बाजार परिसरात विक्री होणारा शेतमाल, फळे आणि अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ तसेच घातक रसायनांचा वापर रोखण्यासाठी राज्याच्या पणन संचालकांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. फळे कृत्रिमरित्या पिकवणे, रसायनांद्वारे त्यांची गोडी वाढवणे किंवा भाजीपाल्याला आकर्षक रंग देण्यासाठी घातक घटकांचा वापर करणे यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक मंगेशकुमार शहा यांनी माहिती दिली की, बाजार समिती प्रशासनाला परवानाधारक व्यापाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत होणाऱ्या तपासणीत दोषी आढळल्यास, संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यान्वये खटला भरला जाईल. तसेच, अशा व्यापाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करून त्यांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा तत्काळ काढून घेतल्या जातील.
--
प्लास्टिक, थर्माकोल वापर टाळण्याचे आवाहन
भाजीपाला व फुलांच्या विक्रीसाठी विहित जाडीपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री नियम १९६७ नुसार वजन-मापांतील तक्रारींचे निवारण करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यावर भर दिला जाणार आहे. ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार शेतमाल मिळवून देण्यासाठी प्रशासन आता अधिक सक्रिय झाले आहे.
---