जिल्ह्यात डेंग्यू अधिसूचित आजार घोषित
खासगी डॉक्टरांना माहिती देणे बंधनकारक; कारवाईचा ईशारा
खासगी रूग्णालयांनी
नंदुरबार, ता. १५ : जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने या आजाराला आता अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रयोगशाळांना त्यांच्याकडे डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास, त्याबाबतची माहिती तत्काळ जिल्हा आरोग्य कार्यालयाला देणे कायदेशीररित्या बंधनकारक झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी यासंदर्भात कडक निर्देश दिले असून, डेंग्यूच्या निश्चित निदानासाठी केवळ इलायझा टेस्ट हीच शासनमान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी, वाढते शहरीकरण आणि विकासकामांमुळे साचणाऱ्या स्वच्छ पाण्यात एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती होत आहे. हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. खासगी डॉक्टरांनी केवळ रॅपिड टेस्टवर विसंबून न राहता संशयित रुग्णांचे नमुने जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेंटरकडे पाठवावेत, जिथे इलायझा चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध आहे.
शनिवारी (ता. १६) राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचे औचित्य साधून डॉ. सोनवणे यांनी नागरिकांना वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
--------------------
कोट
नागरिकांनी डेंग्यूची लक्षणे दिसताच घाबरून न जाता नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात मोफत तपासणी करून घ्यावी. घरपरिसरात पाणी साचू देऊ नका, जेणेकरून डासांची उत्पत्ती रोखता येईल.
- डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी
--