धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त
---
वाहनावर हल्ला;
तिघे ताब्यात
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेल प्रदेश सरचिटणीस, शासकीय ग्रंथालय राज्य नियोजन समिती सदस्या रिता भूपेंद्र बाविस्कर यांच्या वाहनावर मंगळवारी (ता. १२) पहाटे हल्ला झाला. वणी (ता. धुळे) शिवारात ही घटना घडली. संशयितांनी वाहनासमोर लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून कारचे टायर पंक्चर करीत तोडफोड केली. फिर्यादीनुसार रिता बाविस्कर या भावासह मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अमळनेरहून मुंबईकडे वाहनाने (एमएच ५४, बी ४३००) निघाल्या. नवलनगर (ता. धुळे) शिवारात चारचाकी वाहनातून (एमएच ०२, बीआय १९०२), तसेच दुचाकीवरून काही जण पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास वणीजवळ संशयितांनी बाविस्कर यांच्या वाहनाला ओव्हरटेक केले. नंतर पुढील व मागील टायरसमोर लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून वाहन पंक्चर केले. वाहन थांबताच तोडफोड केली. हल्लेखोरांनी स्वतःला गोरक्षक असल्याचे सांगत वाहनात गाय असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय रिता बाविस्कर यांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मिलिंद पाटील (रा. वरखेडी, ता. धुळे), सौरभ जाधव (रा. दंडेवालाबाबानगर, मोहाडी, धुळे) आणि प्रमोद देवीदास सोनवणे (रा. बाळापूर, ता. धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
---
कारच्या अपघातात
एक ठार, दोघे गंभीर
धुळे : पिंपळनेर ते साक्री मार्गावरील शेणपूर फाट्याजवळ भरधाव कारचा भीषण अपघात झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना ५ मेस रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. चिंतामण उखा माळीच (वय ४५, रा. शिवपाडा, ता. साक्री) हे मित्र अतुल आत्माराम देसले आणि हेमंतकुमार भालचंद्र तोरवणे यांच्यासह कारने (एमएच ४७, एओ १४२७) पिंपळनेरहून साक्रीकडे जात होते. दरम्यान, चालक अतुल देसले (रा. कासारे, ता. साक्री) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने शेणपूर फाट्याजवळ कारचा अपघात झाला. अपघातात चिंतामण माळीच यांचा मृत्यू झाला. तसेच हेमंतकुमार तोरवणे व चालक अतुल देसले गंभीर जखमी झाले. सागर चिंतामण माळीच यांच्या फिर्यादीवरून अतुल देसले याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
---
गोवंश वाहतूक;
दोघांविरुद्ध गुन्हा
धुळे : सोनगीर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या पिक-अप वाहनावर कारवाई केली. यात दोन बैलांसह दोन लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ११ मेस सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनगीर फाट्याजवळ केली. पोलिसांनी संशयावरून पिक-अप वाहन (एमएच १२, व्हीक्यू ४३१५) थांबवून तपासणी केली. वाहनात दोन बैल दाटीवाटीने व क्रूरपणे बांधल्याचे आढळले. दोन्ही बैल, तसेच दोन लाखांचे वाहन, असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जगदीश आहिरे यांच्या फिर्यादीवरून रिहान युसूफ कुरेशी (वय २१, रा. दानिश पार्क, मालेगाव, जि. नाशिक) आणि मोहम्मद जाहीद नदीम अख्तर (वय २०, रा. देवमिल्ल, अक्तराबाद, मालेगाव) यांच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.