NSK26H19295 : सुरेश भोळे
मुदत संपलेल्या गाळ्यांचा निर्णय महासभेने घ्यावा
आमदार सुरेश भोळे : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे आयुक्तांनी पालन करावे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : महापालिकेच्या मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बदल करून निर्णय घेतला. महापालिका प्रशासनाला २ व ३ टक्के दरानुसार निर्णय घेऊन तो राज्यशासनाकडे प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहे. आयुक्तांनी यावर निर्णय घेतलेला नसून तो महासभेत मांडून महासभेने यावर निर्णय घ्यावा, आमदार सुरेश भोळे यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.
पद्मालय विश्रामगृह येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश भोळे बोलत होते. पुढे बोलताना आमदार भोळे म्हणाले, की गेल्या १४ वर्षांपासून महापालिकेच्या मालकीचा मुदत संपलेल्या संकुलातील गाळे प्रश्न हा प्रलंबित आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासनाकडे आम्ही कायम पाठपुरावा करून गाळेधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री यांनी देखील २ व ३ टक्के दरानुसार गाळेभाड्यांची आकारणी करण्याचा महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहे. परंतु महापालिका प्रशासनाने अद्याप मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी व गाळेधारकांवरील आर्थिक संकट सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार महासभेपुढे २ व ३ टक्के गाळेभाडे दर आकारणी प्रस्ताव मांडून त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे.
चौकट
उपमहापौर व्यासपीठावर बसू शकता का ?
महासभेत महायुतीमधील भाजप व शिवसेना यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीबाबत आमदार भोळे यांना प्रश्न विचारले असता. आमदार भोळे यांनी प्रशासनाच्या चुकीमुळे शिवसेनेच्या सदस्यांमध्ये गैरसमज झाला आणि त्यातून प्रकार झाला. प्रस्तावातील रस्त्याची योग्य माहिती मनपा प्रशासनाने देणे गरजेचे होते. तसेच उपमहापौर व महापौरांच्या वादाबाबत बोलताना आमदार म्हणाले, की महासभेच्या व्यासपीठावरून प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे व्यासपीठाच्या खाली येऊन त्यांनी प्रश्न विचारले, यात गैर काही नाही. तसेच व्यासपीठावर उपमहापौर बसू शकता का? हा मुळात प्रश्न आहे.