SDA26B07121
ओळ : राजेश वानखेडे
-----------------------
सावदा पालिका जागेवरील
आरक्षण हटविण्याचा घाट
---------
माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडेंचा पत्रकार परिषदेत आरोप
सकाळ वृत्तसेवा
सावदा, ता. १५ : जमिनीचे आरक्षण हटविणे, ही धोरणात्मक बाब आहे. मात्र, पालिका प्रशासकीय काळात येथील गट क्रमांक ६१वरील शाळेचे आरक्षण क्रमांक ३६५ रद्द करण्याच्या घाट तत्कालीन प्रशासक व मुख्याधिकारी यांनी रचला आहे. पालिका इतिहासात जे १०० वर्षांत घडले नाही, ते मुख्याधिकारी यांनी करून पालिकाहिताला बाधा पोहोचवल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा पालिका सभागृहातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते राजेश वानखेडे यांनी गुरुवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत केला.
पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी यांनी स्वतः या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठराव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी व नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक वानखेडे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सावदा नगराध्यक्षा, नगरविकास विभागाचे सचिव, जळगावचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य नगररचना महासंचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.
पालिका हद्दीतील गट क्रमांक ६१वर अनेक वर्षांपासून शाळेचे आरक्षण आहे. डिसेंबर २०२१मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांची मुदत संपल्याने प्रशासकीय राजवट सुरू झाली आणि ही संधी साधून जमीनमालक व मुख्याधिकारी यांनी संगनमत करून हे आरक्षण हटविण्याचा ठराव व प्रस्ताव सादर केला आहे. पण तो शहरविकासाच्यादृष्टीने चुकीचा आहे. हा ठराव निर्णय पालिकेच्या विकासाला मारक ठरणारा असून, नियमबाह्य पद्धतीने प्रक्रिया राबविली आहे. संबंधित जागा ही शाळेसाठी राखीव असून, बाहेरगावच्या व्यक्तीने ही जमीन खरेदी करून २४ जानेवारी २०२२ला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम १२७अंतर्गत सूचना दिली. मात्र, त्याअनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही व त्यानंतरचा ठराव संशयास्पद आहे, असेही वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याशी संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
---
कोट
हा विषय प्रशासकीय काळातील मला या विषयी संबंधित काहीच माहिती नाही कारण संबंधित विषय हा प्रशासकीय काळातील आहे संबंधित विषयी निवेदन मला मिळाले तर मी नक्की माझी भूमिका घेऊन योग्य कार्यवाही करणार.
- रेणुका पाटील, नगराध्यक्षा, सावदा.