जिल्ह्यात ७० टक्के मतदारांचे मॅपिंग
---
निवडणूक विभाग : ३० जूनपासून गृहभेटी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : मतदार याद्या विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) महाराष्ट्रात ३० जूनपासून मतदार याद्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीपूर्वी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत ७० टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे देशभरात एसआयआर मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत महाराष्ट्रात ३० जून ते ७ ऑक्टोबर या कालावधीत मतदारांच्या पडताळणीचे काम करण्यात येईल. जिल्हा निवडणूक विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. ‘एसआयआर’च्या पहिल्या टप्प्यात मतदारांचे मॅपिंगचे काम हाती घेण्यात आले. त्यात सन २००२ आणि सन २०२४ च्या मतदार याद्यांची जुळणी करताना मतदारांच्या मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण केली गेली. या मोहिमेत जिल्ह्यातील ५१ लाख ३६ हजार १९९ मतदारांपैकी ३५ लाख ७३ हजार २११ मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण ६९.५७ टक्के इतके आहे; तर १५ लाख ६२ हजार ९८८ मतदारांचे मॅपिंग विविध कारणांनी पूर्ण होऊ शकलेले नाही.
देशभरात विविध राज्यांमध्ये एसआयआर मोहिमेंतर्गत मतदारांच्या संख्येत घट होताना दिसून आली आहे. बिहार व पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्व मोहिमेत सुमारे ४५ ते ६० लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एसआयआर मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात साधारणत: साडेतीन महिने ही मोहीम चालेल. त्यात बीएलओ ३० जूनपासून मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती गोळा करतील; तर ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल. त्यामुळे जिल्ह्यात मतदार संख्या वाढणार की घटणार हे अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीनंतरच उजेडात येईल.
चार हजार ९१९ बीएलओंवर जबाबदारी
जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत चार हजार ९१९ बीएलओंवर एसआयआर मोहिमेची जबाबदारी असणार आहे. या बीएलओंच्या मदतीसाठी प्रत्येकी सहायक दिले जातील. त्यासाठी नऊ हजार ८३८ अतिरिक्त कर्मचारी नेमणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. हे सर्व कर्मचारी मतदारांची अचूक माहिती गोळा करतील.
मतदार यादी कार्यक्रम
बीएलओ प्रशिक्षण : २० जून ते २९ जून
गृहभेट पडताळणी : ३० जून ते २९ जुलै
प्राथमिक मतदार यादी : ५ ऑगस्ट
दावे व हरकती मुदत : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
अंतिम मतदार यादी : ७ ऑक्टोबर