फोटो: ९२२९१
गुणवत्तेच्या आधारे देशाची निर्यात वाढेल
आर. आर. सिंग : निमा व भारतीय मानक ब्युरोच्या विद्यमाने जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन केल्यास उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि देशाची निर्यात वाढण्यास मदत होते. भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ही संस्था उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचा महत्त्वपूर्ण दुवा असून ती ‘गुणवत्तेची हमी’ देणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे, असे प्रतिपादन बीआयएसच्या मुंबई शाखेचे प्रमुख व शास्त्रज्ञ आर. आर. सिंग यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि भारतीय मानक ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.१५) निमा कार्यालयात बीआयएसने घालून दिलेल्या मानकांबाबत जागृतीसाठी मार्गदर्शन करताना सिंग बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, विद्युत निरीक्षक भागवत उगले, निमा उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, बीआयएसचे तांत्रिक व निमा उप-समिती सदस्य श्रीकांत पाटील तसेच बीआयएसचे सहसंचालक शीतल पाटील उपस्थित होते.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासून त्यांना प्रमाणित करणे आणि उत्पादनांना आयएसआय मार्कद्वारे गुणवत्ता व सुरक्षा प्रमाणित करणे हीदेखील बीआयएसची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. बीआयएसमुळे भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता व सुरक्षितता टिकून राहते आणि ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांपासून संरक्षण मिळते, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
निमा या औद्योगिक संघटनेच्या प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आले आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच २०२६ पर्यंत नाशिक जिल्ह्यात दोन हजार एकर क्षेत्र औद्योगिक वापरासाठी खुले होणार असल्याचा विश्वास निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला. मुख्य वक्ते आणि बीआयएसच्या सहसंचालक शीतल पाटील यांनी बीआयएसचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तरपणे स्पष्ट केले.
विद्युत निरीक्षक भागवत उगले यांनी गुणवत्ता, नियम आणि सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले. मिलिंद राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. मनीष रावल यांनी आभार मानले. यावेळी हेमंत खोंड, सचिन कंकरेज, सोनल दगडे, विरल ठक्कर, कैलास पाटील, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, संजय राठी, शुभम कंकरेज, जयदीप राजपूत, अनिकेत कोचर, करुणा जाधव उपस्थित होते.