धुळे ः टुडे १ साठी
---
फोटो क्रमांक ः 19294
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकारी शरद पवार, आर. आर. पाटील, राहुल कदम, प्रशांत मोहळे आदी.
---
‘ब्लॅक स्पॉट’वर प्रभावी उपाययोजना
अपघातांचा प्रश्न ः धुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघात प्रवण क्षेत्रे) निश्चित करावेत आणि त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी (ता. १४) जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व गतिरोधक समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे अभियंता शिवाजी पवार, पोलिस उपअधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मोहळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त पाहणीचे निर्देश
जिल्ह्यातील एकूण ६७ ब्लॅक स्पॉटसंदर्भात चर्चा करण्यात आली. श्री. पवार म्हणाले, की केवळ कागदोपत्री अहवाल न देता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, आरटीओ आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे प्रत्येक ब्लॅक स्पॉटची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा.
बैठकीतील प्रमुख निर्णय
सूचना फलक व गतिरोधक- अपघात प्रवण क्षेत्रात दिशादर्शक व सूचना फलक लावण्यासह रबलिंग पट्टे तयार करावेत. अनावश्यक गतिरोधक काढून नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी शास्त्रोक्त गतिरोधक बसवावेत. अतिक्रमणांवर हातोडा- महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्स आणि पार्किंगवर कारवाई करावी. तसेच महामार्गावरील दुभाजक (डिव्हाईडर) तोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी तयारी- महापालिकेने जुना आग्रा रोडवरील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वी हटवावीत, जेणेकरून जलमय परिस्थिती निर्माण होणार नाही. वाहन तपासणी- हेडलाइट आणि टेललाइट नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या. तसेच आपत्तीकाळात तातडीच्या मदतीसाठी महामार्ग प्राधिकरणाने रुग्णवाहिका सज्ज ठेवावी.