महापालिका कर्मचाऱ्यांना
एप्रिलपासूनच वाढीव भत्ता
वैद्यकीय भत्त्यापोटी तीन हजार, फरकाची रक्कम येत्या वेतनात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : येथील महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मासिक वैद्यकीय भत्त्यात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्त्यापोटी तीन हजार रुपये प्रतिमहिना मिळणार आहे. १ एप्रिलपासून हे सुधारित दर लागू राहणार असल्याने फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना येत्या पगारातून अदा केली जाईल.
महापौर हिमगौरी आडके यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी यासंदर्भातील घोषणा केली होती. शुक्रवारी (ता. १५) महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी आदेश जारी करताना या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना ८ एप्रिल २००९ च्या आदेशानुसार दरमहिन्याला एक हजार रुपये वैद्यकीय भत्ता दिला जात होता. महासभा ठराव आणि आयुक्तांच्या मान्यतेनुसार यात दोन हजार रुपयांची वाढ करून, भत्ता तीन हजार रुपये केला आहे. सुधारित भत्ता यावर्षीच १ एप्रिलपासून लागू होणार आहे. हा भत्ता इतर कोणत्याही लाभासाठी लागू होणार नसल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
-
इन्फोः
‘त्यांना’ मिळणार नाही लाभ..
बाह्ययंत्रणेने भरल्या जाणाऱ्या पदांना हा भत्ता लागू होणार नाही. नियमित वेतनश्रेणीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच दोन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर हा भत्ता मिळेल. फिक्स-पे, रोजंदारी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना तो लागू होणार नाही. हा वाढीव खर्च विहित लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागवण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या आहेत.