नाशिकच्या पाऱ्यात तीन अंशांची घट
उकाडा कायम; सर्वसामान्य घामाघूम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : शहर व परिसरातील कमाल तापमानात शुक्रवारी (ता.१५) तीन अंशांची घट होऊन पारा ३५.८ अंशावर स्थिरावला. दुपारी काहीकाळ ढगाळ हवामान असले तरी हवेतील उष्मा कायम होता. त्यामुळे सर्वसामान्य घामाघूम झाले.
गेल्या पंधरवड्यापासून नाशिकमध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. शहरातील पारा चाळीश अंशाच्या आसपास स्थिरावत असल्याने शहरवासीय हैराण झाले. मात्र, दोन दिवसांपासून कमाल तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत आहे. मागील चोवीस तासात पाऱ्यात तीन अंशांची घसरण होत तो ३६ अंशाच्या खाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला. परंतू, तापमानात घट झाली असली तरी हवामानात कोरडेपणा कायम आहे. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी नागरिक दिवस-रात्र पंखे, एसी व कुलर सुरु ठेवत आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पाऱ्यातील चढ-उतार कायम आहे. निफाडच्या पाऱ्यात घट होत ४०.९ अंशावर आला. तर दुसरीकडे मालेगावचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४२ अंशावर स्थिर आहे. तर अन्य तालुक्यात कमाल तापमानात काहीशी घसरण झाली. पण, हवेतील उष्णता कायम असल्याने सर्वसामान्यांच्या जिवाची काहिली होत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानातील सततच्या बदलामुळे कमी-अधिक प्रमाणात उष्णतेचा प्रभाव जाणवले. तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.