संक्षिप्त पट्टा
भुसावळला २२ किलो
गांजा जप्त; दोघे ताब्यात
जळगाव : भुसावळ शहरातील खडका रोडवरील ताजनगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करीत २२ किलो गांजा जप्त केला. सुमारे चार लाख ३९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर या प्रकरणातील अन्य दोघे संशयित फरार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. ताजनगर भागात दोन व्यक्ती राहत्या घरातून गांजाविक्री करीत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र नरवाडे, गोपाळ गव्हाळे, उमकांत पाटील, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी व नरवाडे यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले. शुक्रवारी (ता.१५) सकाळी सुमारे १२च्या दरम्यान पथकाने ताजनगर परिसरात छापा टाकला.
---
हॉटेल मालकावर
ग्राहकांकडून हल्ला
जळगाव : मटकीची उसळ खराब असल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना भुसावळ शहरातील भोळे पेट्रोलपंपाजवळील हॉटेल देवयानी येथे गुरुवारी (ता.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी साहील तडवी व त्याच्या दोन ते तीन साथीदारांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षल बाळू पाटील (वय ४१ वर्षे, रा. देनानगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. ते भोळे पेट्रोलपंपाजवळ हॉटेल देवयानी नावाचे हॉटेल चालवितात. फिर्यादीनुसार बुधवारी (ता.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास साहील तडवी व त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी मटकीची उसळ मागविली होती. सुमारे तासाभरानंतर उसळ कडू लागत असल्याची तक्रार त्यांनी केली.
---
संशयास्पद फिरणारा
भुसावळात ताब्यात
जळगाव : भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी सुकलातील टपरीच्या आडोशाला अमोल भागवत राणे (वय २९ वर्षे, रा. गोविंद कॉलनी, सुहास हॉटेलच्या मागे, भुसावळ) हा तरुण सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करताना बाजारपेठ पोलिसांना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चोरी, घरफोडी अथवा अन्य गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो परिसरात फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिस हवालदार चंद्रकांत रायपूरकर यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
---
पपईची आवक
नीचांकी; दरात वाढ
जळगाव : खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत आहे. रमजान महिन्यामुळे पपईस उत्तरेकडे उठाव आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे. सध्या ९ ते १४ रुपये प्रतिकिलो, असा दर जागेवर पपईस शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदा रमजान महिना या काळात आल्याने पपई दरात वाढ झाली. पपई दरवाढ ६ मार्चपासून सुरू झाली. डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपईचे दर जागेवर किंवा थेट खरेदीत चार ते सात रुपये प्रतिकिलो, असे शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु फेब्रुवारीच्या अखेरिस दरात सुधारणा सुरू झाली. मार्चमध्ये पपईला सरासरी १० रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला. तर किमान नऊ व कमाल १२ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. पपईची आवकही नीचांकी स्थितीत आहे.
---
कापूस प्रक्रिया
कारखान्यांत संथ
जळगाव : खानदेशात कापसाची आवक कम झाली आहे. आवकेत मागील तीन ते चार दिवसात मोठी घट झाली असून, ही आवक जळगावातील चोपडा, जामनेर, चाळीसगाव, यावल, जळगाव, अमळनेर, धरणगाव आदी भागात कमी होताना दिसत आहे. कापसाची वेचणी डिसेंबरमध्येच पूर्ण झाली. अनेक शेतकरी वेचणी करून लागलीच कापसाची विक्री करीत होते. कापूस आवक कमी असल्याने मध्यंतरी खेडा खरेदीही रखडत सुरू होती. यामुळे कापूस प्रक्रिया कारखानेही संथ गतीने सुरू होते. या महिन्यात कापूस आवक घटल्याने कारखानेही संथ गतीने सुरू झाल्याची स्थिती आहे. सध्या खानदेशात रोज एक ते दीड हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. जळगाव जिल्ह्यात आवक अधिक कमी होत आहे. अन्य भागातही आवक कमी आहे.
---