निदा खान प्रकरणावर समिती गंभीर
खासगी कंपन्यांतील महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीच्या जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत निदा खान प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली. खासगी कंपन्यांमध्ये महिलांवरील अत्याचार किंवा छळाच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश समितीने प्रशासनाला दिले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीचा जिल्हा दौरा सुरू असून, समितीने शुक्रवारी (ता. १५) जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतला. समिती अध्यक्षा आमदार मोनिका राजळे, सदस्य आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार मंजुळा गावित तसेच आमदार सीमा हिरे यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत खासगी कंपन्यांची वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कंपन्यांमध्ये विशाखा समित्यांची स्थापना झाली आहे की नाही, याचीही चौकशी करण्याचे निर्देश कामगार विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते.
काही विभागांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बैठकीत चर्चा झाली. विशेषतः बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक प्रश्नाबाबत समितीने चिंता व्यक्त करत अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित केली. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करून नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यावर भर देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. एमआयडीसी परिसरासह संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचेही समितीने स्पष्ट केले.
समितीकडून ‘एकल महिला’ उपक्रमाचे कौतुक
जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या ‘एकल महिला’ उपक्रमाचे समितीने विशेष कौतुक केले. एकल महिलांचा सर्वसमावेशक डाटा संकलित करून त्यांच्यासाठी हळदी-कुंकूसारखे सामाजिक उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे समिती सदस्यांनी नमूद केले.