परिक्रमा मार्गाच्या संरेखनावरून शेतकरी आक्रमक
मातोरी-मुंगसरेकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव ; पर्यायी मार्गांचे चार प्रस्ताव, उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : बहुचर्चित परिक्रमा मार्ग (बाह्य रिंगरोड) प्रकल्पाचे संरेखन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत मातोरी व मुंगसरे येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १५) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत मार्गात बदल करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी आणि भूसंपादन प्रक्रियेची माहिती दिली. उपस्थितांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.
सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या बाह्य रिंगरोडसाठी मातोरी व मुंगसरे गावांतील जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, प्रस्तावित मार्गिका, पेसा ग्रामपंचायतींचे ठराव आणि भूसंपादनाचे दर यावरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच दोन आठवड्यांपूर्वी संयुक्त मोजणीदरम्यान शेतकरी व महिलांना मारहाण झाल्याच्या घटनेमुळे वातावरण अधिकच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दोन्ही गावांचा दौरा करून बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी गावातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडसाठी चार पर्यायी मार्ग सुचविले. या पर्यायांमुळे घरे, शेती आणि अन्य मालमत्तेचे नुकसान कमी होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी चारही पर्यायांची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, पर्यायी मार्गांतील तांत्रिक अडचणी आणि संभाव्य धोके याबाबत प्रशासनाने शेतकऱ्यांना माहिती दिली. एका पर्यायाची अंमलबजावणी झाल्यास पुण्यातील नवले पुलासारख्या अपघातांची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्थानिकांनी सुचविलेले चारही पर्याय तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याच्या निष्कर्षापर्यंत प्रशासन पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरांवरून हरकती
पाहणी दौऱ्यावेळी काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या दरांवर आक्षेप घेत शेजारच्या गावांना अधिक दर मिळत असताना आमच्या गावांवर अन्याय होत असल्याची कैफियत मांडली. यावर प्रशासनाने मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांच्या आधारे दर निश्चित केल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन शंकांचे निरसन करत प्रकल्पाचे महत्त्वही विषद केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणास सहमती दर्शविल्याचे समजते.
गावांतच मतभेद
जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचा आरोप करत एका गटाने नाराजी व्यक्त केली. प्रकल्पामुळे अन्याय होत असताना संबंधितांशी चर्चा टाळण्यात आल्याचा आरोप करत या गटाने आक्रमक भूमिका घेत सोमवारपासून (ता. १८) आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोट
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकारी मातोरी आणि मुंगसरे गावांमध्ये गेले. पूर्वीची मोजणी रद्द करण्याचे ठरले असताना त्याच मोजणीच्या आधारे पुढील काम होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन न दिल्यास आमरण उपोषण करण्यात येईल. पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता विल्होळी येथे बैठक आयोजित केली आहे.
- करण गायकर, अध्यक्ष छावा क्रांतिवीर संघटना.
फोटो क्रमांक :- एच-१९३१३