मेन
फोटो : H19296, H19303,H19300
--
कालिदास कलामंदिरात रंगले चित्तथरारक जादूचे प्रयोग
‘सकाळ एनआयई’ तर्फे आयोजन; जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या खेळांनी बच्चेकंपनी दंग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : जिलेटिन नावाचे फ्रान्सहून मागवलेले मशिन...वरून ब्लेड सोडले की मानच धडावेगळी होणार...मशिनमध्ये मान टाकायला प्रेक्षकांमधून धाडस करून आलेला जयवर्धन...मृत्युची जाणीव आणणारे, क्षणाक्षणाला धडधड वाढवणारे संगीत...आणि वरून ब्लेड सुटते...प्रेक्षकांचा श्वास रोखलेलाच राहतो. परंतु जादू संपलेली असते, जयवर्धनची मान सुखरूप, अलगद बाहेर काढली जाते, सर्वजण टाळ्या वाजवतात. एव्हाना जादूगार जितेंद्र रघुवीर यांची ही सर्वात थरारक जादू प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली असते. नाशिककरांनी हा थरार अनुभवला, शुक्रवारी (ता. १५) कालिदास कलामंदिरात आयोजित जादूच्या प्रयोगांमध्ये.
विविध चित्तथरारक प्रयोग जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी करून दाखवले. त्यांच्या प्रत्येक प्रयोगाच्या वेळी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जात होती. आता नवीन काय पहायला मिळणार, अस बच्चेकंपनीचा आनंद आणि जितेंद्र यांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रेक्षकांमधून तत्काळ दिले जाणारे उत्तर कार्यक्रमातील जिवंतपणा वाढवत होते. प्रारंभी ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) बळिराम पवार, जादूगार जितेंद्र रघुवीर, टायनी ट्रेंड्सच्या पूजा राजपूत, लोकमान्य बँकेचे विभागीय व्यवस्थापक संदीप बागले व जिनियस इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका विद्या आहेर-देशमुख या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. अभय सुपेकर म्हणाले, की, ‘सकाळ’चे ‘एनआयई’ आणि ‘यिन’ हे उपक्रम विद्यार्थ्यांना गती देण्यासाठी आहेत. यात त्यांना रूचेल व आवडेल असे दिले जाते. जादू ही असते व नसतेही, मात्र त्याची उत्सुकता देणारी चौथी पिढी जादूगार जितेंद्र यांच्या रूपाने असल्याचेही ते म्हणाले. या वेळी जिनियस इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका विद्या आहेर-देशमुख म्हणाल्या की, आयुष्य जगताना वेगळीच कला आत्मसात करावी लागते. या जादूच्या प्रयोगाच्या निमित्ताने मी व माझ्या शाळेतील विद्यार्थी हे वेगळे जग अनुभवणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रमा पंडित यांनी केले.
---चौकट
आणि विठ्ठल गायब झाला
जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा सर्वाधिक प्रसिद्ध असलेला स्ट्राँग वूडन बॉक्स आणि थॅनॉस मॅजिक या प्रयोगानंतर तर प्रेक्षकांनी कालिदास कलामंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून सोडले. ‘वूडन बॉक्स’मध्ये बेड्या घातलेल्या माणसाला मोठ्या पिशवीमध्ये कैद करून कुलूप बंद केले. आणि केवळ तीन म्हणण्याचा आत त्या माणसाला बॉक्स बाहेर काढून त्यात स्वत: जाऊन पिशवीतून बाहेर पडत, त्यांच्या हातात बेड्या असा हा प्रयोग होता तर ‘थॅनॉस मॅजिक’मध्ये सर्वांदेखत खुर्चीवर चादरीमध्ये गुंडाळलेल्या विठ्ठल या व्यक्तीला तेथून गायब करत एकदम प्रेक्षकांमधूनच स्टेजवर बोलावले आणि त्याच्या जागी मात्र लहान मुलांचे आवडते कार्टून चादरीतून बाहेर काढले, या प्रयोगांनी नाशिककर खूश झाले.