--
धुळे ः टुडे २ साठी...किंवा टुडे १ किंवा खानदेश पान....आज मस्ट
---
ज्ञानेश्वर माउलींच्या जयंतीनिमित्त
धुळ्यात रविवारी ‘मोगरा फुलला’
माजी आमदार कुणाल पाटील यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त धुळ्यात रविवारी (ता. १७) सायंकाळी सहाला हिरे भवन येथे ‘मोगरा फुलला’ या अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होत आहेत. त्याअनुषंगाने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकाराने धुळे येथे मोगरा फुलला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र, त्यांचे अध्यात्मिक कार्य, आणि अभंगरचनांवर आधारित असून संगीत, निवेदन आणि भावस्पर्शी कथन यांचा सुरेख संगम यात अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध निरूपणकार गणेश शिंदे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य उलगडून सांगतील, तर सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे ज्ञानेश्वर माउलींचे अभंग सादर करतील. राज्यभरात या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संत साहित्य, अध्यात्म आणि संगीत यांचा अद्वितीय संगम या कार्यक्रमात आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि वारशाचा जागर करणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. भक्ती, ज्ञान आणि संगीताचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार श्री. पाटील यांनी केले आहे.