बनावट नोटांद्वारे ५० हजारांचा गंडा
---
धुळ्यात ‘चिल्ड्रन बँक’च्या नोटांनी बँक यंत्रणेला ठकवले
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः बँकेची सुरक्षा व्यवस्था आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दावा किती फोल ठरू शकतो, याचा धक्कादायक प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे. ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’, असा स्पष्ट उल्लेख असलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या १०० नोटा (एकूण ५० हजार रुपये) थेट बँकेच्या रोख जमा यंत्रात (कॅश डिपॉझिट मशीन) यशस्वीपणे जमा करून एका तरुणाने बँक यंत्रणेलाच ठकवले. या प्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकारामुळे बँकांच्या सायबर आणि डिजिटल सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील एचडीएफसी बँकेच्या मुख्य शाखेबाहेरील रोख जमा यंत्रात हा प्रकार घडला. याबाबत बँकेचे सहायक प्रबंधक मयूर पुंडलिक पाटील (रा. बोरीस, ता. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन संभाजी पिसोटे (वय २४, रा. जि.प. शाळेजवळ, सुसारे, ता. अहिल्यानगर) या एटीएम कार्डधारक (क्रमांक ५४१९१९xxxxxx४५८८) तरुणाने ९ मेस सकाळी ९ वाजून ५६ मिनिटाला स्वतःच्या खात्यावर या नोटा जमा केल्या. आश्चर्य म्हणजे नोटा स्वीकारताना यंत्रातील सेन्सर्सनी कोणतीही ‘एरर’ दाखविली नाही.
नोटांवर एकच नंबर
नियमित पडताळणीदरम्यान बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यंत्रात जमा झालेल्या नोटा तपासल्या असता, त्या पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या नोटांवर अधिकृत मजकुराऐवजी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’, ‘भारतीय बच्चो का बैंक पाँच सौ’ तसेच, ‘गॅरंटीड बाय चिल्ड्रन बँक’ असे स्पष्टपणे छापले होते. सर्वच्या सर्व १०० नोटांवर ‘३ सीबी ००००००’ हा एकच क्रमांक होता. या नोटांचा रंग, आकार आणि महात्मा गांधी यांचे छायाचित्र अगदी मूळ चलनी नोटांप्रमाणे हुबेहूब तयार केले होते. यामुळे यंत्रणाही चक्रावून गेली.
हायटेक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या बँकांच्या रोख जमा यंत्रांमध्ये अशा ‘खेळण्यातील’ नोटा स्वीकारल्या गेल्याने बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली आहे. नोटांवरील मजकूर डोळ्यांना स्पष्टपणे वेगळा दिसत असताना, अत्याधुनिक यंत्राला त्यातील बनावटपणा का ओळखता आला नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्य खातेदारांमध्ये कमालीचे संभ्रमाचे वातावरण असून, एटीएम किंवा सीडीएम व्यवहारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
चौकट
चौकशीचे मोठे आव्हान; तपास सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअकधीक्षक राजकुमार उपासे, निरीक्षक निवृत्ती पवार यांनी पथकासह तातडीने बँकेत धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. संशयित सचिन पिसोटे याने यापूर्वीही अशा प्रकारचे व्यवहार इतर बँकांमध्ये केले आहेत का? या बनावट नोटांचा मुख्य स्रोत काय आहे? यामागे एखादी मोठी आंतरजिल्हा टोळी कार्यरत आहे का? या दिशेने पोलिसांनी तपास फिरवला आहे. आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक महेश घायताड तपास करीत आहेत.