ॲंकर
NSK26H22027
जळगाव : बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या ताडपत्री.
ताडपत्री विक्रीला, पण पावसाची प्रतीक्षा
यंदा २० टक्के भाववाढ; सर्वसामान्यांना महागाईचा फटका
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२३ : जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने ताडपत्रीच्या खरेदी-विक्रीला वेग आला आहे. शेतकरी, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांकडून ताडपत्रीला मोठी मागणी निर्माण झाली असून, बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे यंदा ताडपत्रीच्या दरात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अद्याप पावसाला सुरुवात झाली नसली तरी बाजारात ताडपत्री विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये शेतकरी शेतीसाठी लागणारे साहित्य, खतांच्या गोण्या, पशुखाद्य तसेच विविध कृषी साहित्य पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्रीची खरेदी करीत आहेत. तसेच केळी बागांमधील साहित्य आणि शेतमालाचे संरक्षण करण्यासाठीही ताडपत्रीचा वापर वाढला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वाढलेली मागणी आणि दरवाढ यामुळे जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे.
विक्रीत मोठी वाढ
जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा आणि यावल येथील बाजारपेठांमध्ये ताडपत्रीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. घाऊक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मागणीत लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे दरही वाढले आहेत. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि वाढती मागणी यामुळे ताडपत्रीचे भाव सुमारे २० टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
टिकाऊ ताडपत्र्यांची निवड
बाजारात विविध आकार आणि गुणवत्तेच्या ताडपत्र्या उपलब्ध असून जाड, मजबूत आणि जलरोधक ताडपत्र्यांना अधिक मागणी आहे. शेतकरी स्वस्त पर्यायांपेक्षा टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येणाऱ्या ताडपत्र्यांची निवड करत आहेत. त्यामुळे उच्च दर्जाच्या ताडपत्र्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
बांधकाम क्षेत्रातही वापर
दरम्यान, बांधकाम क्षेत्रातही ताडपत्रीचा वापर वाढला आहे. बांधकाम साहित्याचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या आकाराच्या ताडपत्र्यांची खरेदी होत आहे. तसेच ग्रामीण भागातील लहान दुकानदार आणि फेरीवाले पावसापासून मालाचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्रीचा वापर करत आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास मागणी आणखी वाढण्याची शक्यता असून ताडपत्री विक्रीचा हंगाम यंदा समाधानकारक राहण्याची अपेक्षा आहे.
२०० ते ३१०० पर्यंत किंमत
बाजारपेठेत २०० रुपयांपासून ते ३१०० रुपयांपर्यंत विविध प्रकारात ताडपत्री उपलब्ध आहेत. यात टरकोलीन, ब्लॅक, व्हरजिंग असे प्रकार असून विविध आकार आणि रंगात मिळत आहेत. किलो किंवा नगाने तसेच मिटर प्रमाणे देखील विक्री केली जात आहे.
कोट
यंदा अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाहिजे तशी मागणी अद्याप नाही. पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. ट्रक चालक, दुकाने, शेतकरी वर्ग अधिक प्रमाणात खरेदी करीत असतो. यंदा भाव वाढ देखील झाली आहे.
- बारकू भारुडे, विक्रेता
चौकट
बाजारपेठेची स्थिती अशी
- विक्रेत्यांना पावसाची प्रतीक्षा
- यंदा दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ
- जाड व जलरोधक ताडपत्र्यांना अधिक पसंती
- शेतकरी, व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी
- जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीला वेग