‘वे टू ग्रँडमास्टर’ बुद्धिबळ
स्पर्धेचे शुक्रवारी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : लहान वयातील बुद्धिबळपटूंच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यातील ग्रँडमास्टरचा शोध घेण्यासाठी पंचवटीत विशेष बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बोट्विनिक स्कूलतर्फे आयोजित वे टू ग्रँडमास्टर ही स्पर्धा शुक्रवारी (ता. २६) सकाळी नऊपासून पंचवटीतील दादा जेठानंद पगरानी ट्रस्ट, जाजू वाडी येथे पार पडणार आहे.
१४ वर्षांखालील खेळाडूंसाठी (जन्म १ जानेवारी २०१२ किंवा नंतर) ही उत्तम संधी आहे. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने व फिडेच्या नियमांनुसार खेळवली जाईल. प्रत्येक खेळाडूला १५ मिनिटे आणि १० सेकंदांचा इन्क्रिमेंट वेळ मिळेल. एकूण संख्येवरून फेऱ्या निश्चित केल्या जातील.
या स्पर्धेत आकर्षक रोख बक्षिसे व पदके दिली जाणार आहेत. याशिवाय ८, १० व १२ वर्षांखालील तिन्ही वयोगटांतील पहिल्या पाच विजेत्यांनाही रोख बक्षिसे मिळतील. नोंदणीसाठी सुनील शर्मा यांच्याशी संपर्क साधून शुल्क भरल्यावर गुगल फॉर्म लिंकद्वारे नावनोंदणी करता येईल. आंतरराष्ट्रीय पंच मंगेश गंभीर तांत्रिक साहाय्यक म्हणून काम पाहत असून, अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---