फोटो ः 22168
नाशिक ः मुक्त विद्यापीठात सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी क्षमता विकसन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मान्यवर.
-----
ग्रंथालय कर्मचाऱ्याचा क्षमता विकास कार्यक्रम
राष्ट्रीय पुस्तकालय अभियानांतर्गत मुक्त विद्यापीठात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुस्तकालय अभियानांतर्गत सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी क्षमता विकसन कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. २१) ते गुरुवार (ता. २५) दरम्यान चालणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले.
--
विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रामार्फत आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील ६० पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय पुस्तकालय अभियानाचे अतिरिक्त अभियान संचालक तथा संस्कृती मंत्रालयाचे उपसचिव राजेंद्रसिंह बोरा यांनी ऑनलाइन स्वरूपात सहभाग नोंदविला. यावेळी राज्य शासनाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, नागपूर विद्यापीठाच्या संशोधक प्रा. शालिनी लिहितकर, प्रकल्प अधिकारी दिपांजन चॅटर्जी, डॉ. रश्मी रानडे व ज्ञानस्रोत केंद्र प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. सोनवणे म्हणाले, की आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वाचनालयांपुढे आव्हाने आणि नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. ऑनलाईन व्याख्यानात राजेंद्रसिंह बोरा यांनी वाचक टिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज व्यक्त केली. अशोक गाडेकर यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक सार्वजनिक वाचनालये असून त्यांचे जिओ टॅगिंग झाले असल्याचे सांगितले. प्रा. शालिनी लिहितकर यांनी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वाचनालय चळवळ महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
दिपांजन चॅटर्जी यांनी प्रास्ताविक, अभिलाषा बाथो यांनी सूत्रसंचालन व डॉ. प्रकाश बर्वे यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी ''सार्वजनिक ग्रंथालयांमधील उदयोन्मुख प्रवाह'' यावर, तर यामिनी गालापुरे व डॉ. प्रकाश बर्वे यांनी ‘गुगलच्या माध्यमातून संकेतस्थळ निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले.
---