फोटो क्रमांक : 60476
---
संस्कार भारतीद्वारे ‘राष्ट्र वंदना’
संघ शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे संघगीतांमधून राष्ट्रवंदना करण्यात आली. या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करताना राष्ट्रप्रेम, संस्कार व एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
संस्कार भारतीतर्फे कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात रविवारी (ता. २१) आयोजित या संघगीत कार्यक्रमाप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री रवींद्र बेडेकर व पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. विनायक गोविलकर यांनी सादर केलेल्या निरूपणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर गायक विवेक केळकर, धनलक्ष्मी पटवर्धन, श्रीराम तत्ववादी, राजन अत्रे, आशिष रानडे, मधुरा बेळे, ज्ञानेश्वर कासार, रागिणी कामतीकर व डॉ. अविराज तायडे यांनी विविध गीते सादर केली. उपस्थित नाशिककरांनी या गीतांना उत्स्फूर्तपणे दाद दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. सोनाली तेलंग यांनी सूत्रसंचालन केले. संस्कार भारतीचे कोषप्रमुख सुबोध जोशी यांनी आभार मानले. याप्रसंगी विभाग संघचालक कैलास साळुंखे, जिल्हा संघचालक डॉ. विजय मालपाठक, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष रघुवीर अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नाशिककर उपस्थित होते.
--------------------
-----------------