फोटो : ६०४८८, ६०४८६, २२२०३, २२२०४, २२१९६, २२१९४, २२१९८
विधान परिषदेत अपक्ष गितेंची बाजी
महायुतीला धक्का; दराडेंना धोबीपछाड; गिते समर्थकांचा आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना धोबीपछाड दिली. निवडणुकीत गितेंनी तब्बल १०९ मतांनी दराडेंचा पराभव केला असून, महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गिते यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही युतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २२) सकाळी आठपासून विधान परिषद मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण चार टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. या वेळी पहिल्या फेरीतच अपक्ष गिते यांनी तब्बल ३५७ मते मिळविली. प्रतिस्पर्धी नरेंद्र दराडे यांना २४८, तसेच दुसरे अपक्ष प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत विजयाला गवसणी घातली.
विधान परिषद निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडे ४६६ मतांचे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे निवडणुकीत विजय आपल्याच उमेदवाराचा होईल, असा दावा महायुतीकडून करण्यात येत होता. पण अपक्ष गिते यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम असल्याने भाजपचे मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत व दादा भुसे हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते. मात्र, अपक्ष गिते यांनी महायुतीला धक्कातंत्र देत विजयश्री खेचून आणली. दरम्यान, निवडणुकीत दराडेंना मिळालेली मते बघता महायुतीची तब्बल २१८ मते फुटली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गितेंच्या विजयाची घोषणा करताच त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
कोट
निवडणुकीत मी प्रचार थांबविला होता. संपूर्ण निवडणुकीत मी घरी बसून होतो. पण कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेत मला विजयापर्यंत पोहोचविले. त्यामुळे विजयाचे श्रेय मी कार्यकर्त्यांना देतो. शिवसेनेच्या उमेदवाराबाबत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. मतदानामधून ती समोर आली. मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कार्यरत राहणार असून, पक्षप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन.
-गोकुळ गिते, नवनिर्वाचित आमदार
---
महायुतीत गद्दारी झाली : दराडे
निवडणुकीत स्पष्ट बहुमत असतानाही महायुतीमध्ये गद्दारी झाली. आमच्या नेत्यांना अंधारात ठेवण्यात आले असून, आमचा विश्वासघात झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता सर्वांनीच माझा विश्वासघात केला.
-नरेंद्र दराडे, महायुतीचे उमेदवार
---
गोकुळ गिते यांचा परिचय
आमदार गोकुळ गिते हे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचे बंधू आहेत. पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. गणेश गिते यांचा राजकीय वाटचालीत गोकुळ गिते यांना पडद्याआडून मोठा हातभार लाभला आहे. दीड वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन गोकुळ गिते यांनी सांभाळले होते.
---
तेरा मतपत्रिका बाद
निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी तेरा मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या. बाद ठरविलेल्या मतपत्रिकेत गोकुळ गिते यांच्या नऊ, तर नरेंद्र दराडे यांच्या दोन मतपत्रिकांचा समावेश आहे. एका मतपत्रिकेवर दोन्ही उमेदवारांना एकच पसंतीक्रम देण्यात आल्याने ती बाद ठरली असून, एक मतपत्रिका कोरी होती. बाद केलेल्या मतपत्रिकांवर मतदारांनी गोल चिन्ह करणे, उमेदवाराच्या नावावर टिकमार्क करणे, छायाचित्रावर पसंतीक्रम लिहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
---
अंतिम निकाल
एकूण मतदान : ६१८
अवैध मतदान : १३
वैध मतदान : ६०५
विजयी कोटा : ३०३
गोकुळ गिते (अपक्ष) : ३५७
नरेंद्र दराडे (शिवसेना) : २४८
प्रसाद हिरे (अपक्ष) : ००
-------------------