जळगाव जिल्ह्यातील काही भागांत तुरळक पाऊस
(उपशीर्षक)
दिवसभर ढगाळ वातावरण; हवामानातील बदलाने उकाड्यात वाढ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ ः जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दुपारी साडेतीननंतर जळगाव शहरासह काही भागात पावसाचे आगमन झाले. मात्र, पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनअखेर आला असतानाही पाऊस न आल्याने सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
खरीप हंगामाची बहुतांश तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी मशागत, बियाणे आणि खतांची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र, पावसाअभावी पेरणी रखडली आहे. काही भागात शेतकऱ्यंनी लागवड करून ठेवली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आस आहे.
ऊन-सावल्यांचा खेळ
रात्रीपासूनच वातावरणात बदल झाला होता. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्याची तीव्रता काहीशी कमी होती. सकाळी काही भागात तुरळक पाऊस झाला. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा आणि घामाच्या धारांचा त्रास कायम आहे. दुपारी दमट वातावरणामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत होती. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहिल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरासह आजूबाजूच्या परिसरात तुरळक पाऊस झाला. दुसरीकडे ऊनही पडले होते.