टुडे ४ : मेन फिचर
NSK26H22231 (जाहिरातीचा फलक ब्लर्ब करावा)
जळगाव : स्वातंत्र्य चाैक ते शिवतीर्थ मैदानापर्यंत रस्त्याच्या दुभाजकातील वाळलेली झाडे.
शीर्षक
दुभाजक सुशोभिकरण की विद्रुपीकरण?
झाडे कोमेजली, जाहिरातींचा अतिरेक; मनपाच्या संकल्पनेलाच हरताळ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातील प्रमुख मार्गांचे सौंदर्य वाढविण्यासाठी महापालिकेने दुभाजक सुशोभिकरणाची जबाबदारी विविध सामाजिक संस्था, कंपन्या व व्यावसायिकांना दिली. स्वतःच्या खर्चातून दुभाजकांमध्ये वृक्षारोपण, देखभाल-दुरुस्ती करण्यासह मर्यादित स्वरूपात जाहिरात फलक लावण्याची मुभाही देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा मूळ उद्देशच हरवत चालल्याचे चित्र शहरातील अनेक रस्त्यांवर दिसून येत आहे.
स्वातंत्र्य चौक ते क्रीडा संकुलासमोरील महाराष्ट्र बँकेपर्यंतच्या सुमारे ५०० मीटर अंतरातील दुभाजकाचे सुशोभिकरण दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले. या दुभाजकात विविध प्रकारची शोभेची व हरित झाडे लावण्यात आली होती. त्याचबरोबर तब्बल ५० हून अधिक जाहिरात फलक उभारण्यात आले. मात्र सुशोभिकरणानंतर झाडांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अनेक झाडांना नियमित पाणी मिळाले नसल्याने ती पूर्णपणे जळून गेली असून काही झाडे शेवटची घटका मोजत असल्याची अवस्था आहे.
जाहिरातींमुळे विद्रुपीकरण
या मुख्य रस्त्याच्या दुभाजकातून हिरवळ आणि आकर्षक सौंदर्य खुलून दिसणे अपेक्षित होते, तेथे आता जाहिरातींची गर्दीच अधिक लक्ष वेधून घेत आहे. केवळ ५०० मीटरच्या पट्ट्यात ५० पेक्षा अधिक फलक उभारण्यात आल्याने दुभाजकांचे सुशोभिकरण कमी आणि विद्रुपीकरण अधिक झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. परिणामी, शहर सौंदर्यीकरणाचा महापालिकेचा हेतूच पाण्यात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोर्ट चौक दरम्यानचे काम संथ
दरम्यान, क्रीडा संकुल ते कोर्ट चौक या मार्गावरील दुभाजक सुशोभिकरणाची जबाबदारी एका संस्थेकडे सोपविण्यात आली होती. मात्र तीन ते चार महिने उलटूनही या मार्गावर केवळ जुनी झाडे काढण्यापलीकडे कोणतेही ठोस काम झाल्याचे दिसत नाही. नवीन वृक्षारोपण किंवा सौंदर्यवर्धनाची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत.
दुभाजकात केवळ बसविले लाईट
चित्रा चौक परिसरातील दोन्ही बाजूंच्या दुभाजकांचे सुशोभिकरण स्वीकारलेल्या कंपनीकडूनही अपेक्षित कामे झालेली नसल्याचे दिसून येते. या ठिकाणी केवळ सजावटीच्या लाईट्स उभारण्यात आल्या असून हरितीकरण किंवा अन्य सौंदर्यवर्धनाची कामे अद्याप अपूर्णच आहेत.
चौकट
मनपाने दखल घेणे गरजेचे
महापालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राबविलेली ही संकल्पना स्तुत्य असली, तरी संबंधित संस्था आणि कंपन्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे तिचे रूपांतर अपुऱ्या नियोजनाच्या उदाहरणात होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने दखल घेत कामांचे नियमित मूल्यमापन करून जबाबदार संस्थांना जाब विचारण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोट
दुभाजकांमध्ये नव्याने झाडे लावण्याच्या सूचना जबाबदारी घेतलेल्या संस्थांना दिल्या आहे. पावसाची वाट पाहणे सुरू असून पाऊस पडताच नवीन झाडे लावली जाणार आहेत. तसेच दुभाजकात अधिक जाहिराती लावलेल्या संबंधित संस्थांना सूचना दिल्या आहे.
- प्रकाश पाटील, अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका, जळगाव.