पीक नुकसानभरपाईसाठी ३० जूनपर्यंत मुदत
केवायसीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २३ : ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून, अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर केलेली नाहीत. शासनाच्या वेबसाईटवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन अक्राणीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.
तालुक्यातील दहा हजार शंभर शेतकऱ्यांची माहिती आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही प्रामुख्याने ५९० शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तसेच २४४ शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार मॅपिंग नसल्यामुळे त्यांच्या शासकीय नुकसानभरपाईची रक्कम नाकारण्यात आली आहे.
ज्या पात्र शेतकऱ्यांची भरपाई रक्कम बँक खात्याच्या समस्येमुळे नाकारले गेले आहे, त्यांनी त्वरित आपल्या संबंधित बँकेत जाऊन आधार मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी पुढील दिवसांत ती पूर्ण करून घ्यावी. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे बँक पासबुक, आधारकार्डची छायांकित प्रत, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आदींसह कागदपत्रे जमा करावीत.
३० जून २०२६ या अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही माहितीचा विचार केला जाणार नाही. जर एखादा शेतकरी विहित मुदतीत माहिती सादर न केल्यामुळे किंवा ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभापासून वंचित राहिला, तर त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरीच जबाबदार राहतील, याची गंभीर नोंद घ्यावी, असेही तहसीलदार ऐतवडे यांनी कळविले आहे.