मेन
--
लोगो ः जागतिक विधवा दिनविशेष
--
अभियानाच्या माध्यामातून विधवांना मुक्तीचे कवाड
स्वाभिमानाची नवी वाट ः ‘विधवा सन्मान अभियाना’ने दिला शेकडो महिलांना सन्मान
--
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : विधवा झाल्यानंतर घरातूनच चांगली वागणूक मिळाली नाही. मुलाच्या लग्नात पूजेला बसू दिले नाही ना वाळवणाच्या पदार्थांना हात लावू दिला. सख्या बहिणींनी टोकल्यावर काय करणार? पतीच्या निधनानंतर प्रेत जवळ असताना पायात घट्ट असलेली जोडवी नातेवाईकांनी अक्षरशः बोटात रॉड घालून तोडली. अशा या परिस्थितीत विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाचा आधार मिळाला आणि स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता आल्याचा अनुभव यशोदा अभय पर्वतकर सांगतात.
--
काठेगल्ली परिसरात जानेवारी २०२३ मध्ये विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे संपर्क कार्यालय सुरू झाले. या कार्यालयाच्या माध्यमातून दोनशेपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला असून, अभियानाच्या माध्यमातून विधवा महिलांना मुक्तीचे कवाड उघडे झाले आहे. या ठिकाणी महिलांचे समुपदेशन करणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे, प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे, मुलांच्या संगोपनासाठी तसेच कायदेशीर मदत करणे यासारखे काम कार्यालयाच्या माध्यमातून केले जाते; परंतु कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात नसल्याने तिथपर्यंत महिलांना पोहोचणे शक्य होत नाही म्हणून पेठ रोड येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या अभियानासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी दिल्ली येथे परिषद घेण्यात आली. यावेळी प्रत्येक राज्याच्या सदस्याने विधवा महिलांच्या भीषण परिस्थितीचे वर्णन केले. त्यामुळे सर्वानुमते विधवा महिलांसंदर्भात राष्ट्रीय धोरण ठरविण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. शासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
---
कोट
दिल्लीला झालेल्या अधिवेशनानंतर राज्य शासनाला धोरण निश्चितीसाठी सूचना देऊनही अंमलबजावणीच्या पुढे काहीही होत नाही. सर्वांना सरसकट एकल महिला म्हणून न गणता विधवांचा दर्जा वेगळा करण्यात यावा.
- राजू शिरसाठ, समन्वयक महाराष्ट्र राज्य
---
शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागातील विधवा महिलांच्या समस्या मोठ्या असतात. कारण त्यांना स्वतःच्या घरातून विरोध केला जातो. त्यांची विचारधारा इतकी घट्ट असते की त्यांची पुन्हा पुन्हा मनधरणी करावी लागते.
- संगीता भूतकर, सामाजिक कार्यकर्त्या
--
माझ्या तिरडीला विधवा खांदा देतील!
विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाला प्रमोद झिंजाडे यांनी सुरुवात केली. या अभियानाच्या माध्यमातून असंख्य विधवा महिलांना आधार मिळत आहे. जागतिक विधवा दिनाच्या पार्श्वभूमीवर झिंजाडे यांनी पतीच्या निधनानंतर विधवा महिलांमध्ये कोणताही दोष नसताना त्यांच्यावर अनिष्ट प्रथा लादल्या जातात, त्यांना तुच्छ लेखले जाते, हा मानवी अधिकाराचा भंग असल्याने सामाजिक कलंक पुसून काढण्यासाठी व त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी संकल्प केला आहे. ते म्हणतात की, ‘माझ्या निधनानंतर अंत्ययात्रेच्या वेळी माझ्या तिरडीला खांदा देण्याचा अधिकार सर्व जाती, धर्म आणि पंथातील विधवा महिलांना असणार आहे. माझ्या या निर्णयाला नात्यातील व समाजातील कोणत्याही व्यक्तीने विरोध करू नये. माझ्या मृत्यूनंतर कोणताही अनावश्यक खर्च (दहावे, तेरावे, वर्षश्राद्ध) यासाठी खर्च न करता, विधवा प्रथा निर्मूलन व विधवा महिलांच्या विकासात्मक उपक्रमासाठी खर्च करावा’, असा संकल्प प्रमोद झिंजाडे यांनी केला आहे.
---