आचारसंहितेनंतर विकासकामांना मिळणार गती
विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर; रखडलेल्या प्रस्तावांना चालना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता आदर्श आचारसंहिता संपुष्टात येत असल्याने जळगाव शहरातील रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेल्या तब्बल ५२ कोटी २९ लाख रुपयांच्या विकासकामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पातून शहरातील सर्व प्रभागांमध्ये समान विकास साधण्याच्या उद्देशाने प्रत्येक नगरसेवकासाठी ६३ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात नगरसेवक निधीतील १० लाख रुपये आणि महापालिका निधीतील ५३ लाख रुपयांचा समावेश आहे. आचारसंहितेमुळे या कामांच्या प्रस्तावांवर निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र आता प्रशासकीय स्तरावरील अडथळे दूर झाल्याने प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मूलभूत सुविधा कामांना प्राधान्य
या निधीतून शहरातील रस्त्यांचे मजबुतीकरण, गटारींची उभारणी, उद्यानांचे सुशोभिकरण, खुल्या भूखंडांचा विकास तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्यासारखी अनेक मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पात या कामांसाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद असताना नगरसेवकांकडून तब्बल ३५० कोटी रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामुळे उपलब्ध निधीचे समान वाटप करण्याची भूमिका महापौर दीपमाला काळे यांनी घेतली होती.
प्रक्रियेला येणार वेग
आचारसंहिता संपल्यानंतर प्रशासनाकडून मंजुरी, तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रियेला वेग दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पावसाळ्यामुळे काही बांधकाम स्वरूपाच्या कामांना विलंब होण्याची शक्यता असली, तरी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यास पावसाळ्यानंतर विकासकामांचा मोठा टप्पा एकाचवेळी सुरू होऊ शकतो.
चौकट
स्थायी व महासभा होणार आठवडाभरात
महापालिकेची महासभा १४ मे रोजी झाल्यानंतर विधानपरिषदेची आचारसंहिता लागल्याने जून महिन्यात स्थायी समितीची सभा तसेच महासभा झालेली नाही. त्यामुळे स्थायी समिती सभेत तसेच महासभेत विविध विकासात्मक विषयांना मंजुरी यामुळे मिळू शकलेली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपली असून आठवड्याभरात स्थायी समित व महासभा होणार असल्याचे माहिती समोर येत आहे.