धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 22241 - वेदांग सोनार
--
साक्रीच्या वेदांगची ऑस्ट्रेलियात पीएचडीसाठी निवड
--
ऊर्जा क्षेत्रात संशोधनासाठी मिळाली तीन वर्षांची फेलोशिप
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २२ : येथील शिवाजीनगरचा रहिवासी वेदांग अविनाश सोनार याची ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न क्वीन्सलँड’मध्ये तीन वर्षांच्या पीएचडी संशोधनासाठी प्रतिष्ठेच्या फेलोशिपसह निवड झाली. सोनार परिवारात सलग दुसऱ्या पिढीने संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर मारलेली ही भरारी आहे.
वेदांगचे काका डॉ. प्रशांत सोनार २६ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत फेलोशिपद्वारे पीएचडी करण्यासाठी जर्मनीला गेले होते. त्यांनी विविध देशांत संशोधनात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून जगातील सर्वोत्तम पाच टक्के संशोधकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्या पत्नी योगिता सोनार यांनीही शिक्षणातील २० वर्षांच्या खंडानंतर ‘क्यूयूटी’मधून एम.फिल. पूर्ण केले. कुटुंबातील याच काकांचा आदर्श ठेवून वेदांगने बालपणापासून संशोधनाचे ध्येय बाळगले होते. तो वर्तमान काळातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सोडियम व पोटॅशियम आयन बॅटरीच्या ‘एनर्जी स्टोरेज’वर विशेष संशोधन करणार असून त्याला प्रा. अशोक नानजुनंदन यांचे मार्गदर्शन झाले. यापूर्वी त्याने प्रा. दीपक दुबल यांच्या मार्गदर्शनात ‘क्यूयूटी’ ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे एम.एस्सी.चा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
वेदांगचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साक्रीत तर बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिकस्थित केटीएचएम कॉलेज येथे झाले. त्याने पुणे येथील एस. पी. कॉलेज येथून बी.एस्सी. आणि व्हीआयटी (वेल्लोर, तमिळनाडू) येथून एम.एस्सी. पूर्ण केली. तो निवृत्त सेवक (स्व.) मुरलीधर गोविंद सोनार व निवृत्त प्राथमिक शिक्षिका कमलबाई सोनार यांचा नातू असून, साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक अविनाश सोनार व किरवाडे (ता. साक्री) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका माधुरी सोनार यांचा सुपुत्र आहे. वेदांग २५ जूनला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असून त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून कौतुक होते आहे.