आमदार गितेंचे विमान कोठे घेणार भरारी?

आमदार गितेंचे विमान कोठे घेणार भरारी?
Published on
आमदार गितेंचे विमान कोठे घेणार भरारी? शिवसेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीत जायंट किलर ठरलेले आमदार गोकुळ गिते यांना शिवसेनेत घेण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास विमान धाडून गिते यांना भेटीसाठी मुंबईत पाचारण केले, तर स्वत: गिते यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षप्रवेशाचा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे गितेंचे विमान कोठे भरारी घेणार याबाबत राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवारी मिळविण्यापासून माघारीपर्यंत, तसेच आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या विधान परिषद निवडणुकीत अखेर गिते यांनी बाजी मारली. या विजयानंतर गिते यांनी दराडेंवर सडकून टीका करताना ‘निवडणुकीत माझा बाप काढण्यात आला. माझे वडील सात ते आठ वर्षांपासून पॅरेलाइज असून, निवडणुकीत मी त्यांना माझा बाप दाखवून दिला’ अशा शब्दांत गितेंनी दराडेंवर वाग्बाण सोडले. या वेळी यशाचे गमक सांगताना गितेंनी मी निवडणुकीतून माघार कधीच घेतली नव्हती; परंतु मी घरात बसलेलो असताना माझ्या पाठीशी कार्यकर्ते व मित्र खंबीरपणे उभे राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देत मी घरातच थांबलो. पण, माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकले नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो, अशी भावनादेखील गितेंनी बोलून दाखविली. नाशिकच्या धक्कादायक निकालाची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेतली. तसेच निकालाचा कल बघता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी गितेंच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधत गितेंना शिवसेना प्रवेेशाची ऑफर दिली. एवढ्यावरच न थांबता पक्षातर्फे विमान पाठविण्यात येत असून, तातडीने मुंबईला येण्याचा निरोप सामंत यांनी गितेंच्या निकटवर्तीयांना दिला. त्यामुळे गिते भाजपशी निष्ठा कायम राखणार की शिवसेनेमध्ये दाखल होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चौकट गिते कुटुंबीय भावुक गोकुळ गिते यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांची पत्नी आणि मुलगी मतमोजणी केंद्रात दाखल झाले, तर विजयाचे प्रमाणपत्र घेत बाहेर येताच गितेंच्या बहिणीने सर्वप्रथम भावाचे अभिनंदन केले. या वेळी भावाच्या यशाने बहिणीला अश्रू अनावर झाले. त्यानंतर गोकुळ गिते यांनी मोठे बंधू गणेश गिते यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी कुटुंबातील सदस्यांसमवेत समर्थकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com