अवतीभवती
--
‘रात्र आहे पौर्णिमेची’
सोमवारी संगीत मैफल
नाशिक : महानगरपालिका पुरस्कृत प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूरकर यांना समर्पित स्वरांजली संगीत कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता. २९) जूनला महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी साडेसहाला करण्यात आले आहे. क्षितीजा प्रस्तुत ‘रात्र आहे पौर्णिमेची’ या संगीत मैफलीत गायिका विद्या कुलकर्णी, मुग्धा कुलकर्णी, क्षितीज कुलकर्णी, अभिषेक नलावडे कल्याणपूरकर यांची गाणी सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असणार आहे.
--
सामुदायिक योगाभ्यासाचा वर्ग संपन्न
नाशिक : विश्वास बँक व विश्वास हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामुदायिक योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांकडून विविध आसने करून घेण्यात आली तसेच त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. योगप्रशिक्षक पिराजी नरवाडे यांनी मार्गदर्शन करताना मनाला चैतन्यमय ठेवण्यासाठी व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी योगसाधनेला जीवनशैलीचा भाग बनविण्याचे सांगत आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात योग जीवनात आनंद निर्माण करतो व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असल्याचे सांगितले. यावेळी योग शिक्षक मंदार भागवत, राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
--
कामतीकर यांच्या
शिष्यांची सोमवारी मैफल
नाशिक : स्वराजीत संगीत अकादमी प्रस्तुत स्वरसुमनांजली पद्मभूषण सुमन कल्याणपूरकर यांना आदरांजलीपर संगीत मैफलीचे आयोजन (ता. २९) सोमवारी करण्यात आले आहे. गायिका रागिणी कामतीकर यांच्या शिष्या सुमन कल्याणपूरकर यांची गाणी सादर करणार असून त्यांना प्रशांत महाले (किबोर्ड), सतीश पेंडसे (तबला) साथसंगत करतील. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात सायंकाळी साडेसहाला कार्यक्रम होणार असून प्रवेश सर्वांसाठी खुला असणार आहे.
---