NSK26H22253
नंदुरबार ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती निवडीनंतर आनंदोत्सव साजरा करताना संचालक मंडळ व मनोज रघुवंशी.
---
नंदुरबार ‘कृउबा’ समितीला नवे नेतृत्व
ठाणसिंग राजपूत सभापती, सुनील पाटील उपसभापती
नंदुरबार, ता. २२ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ठाणसिंग राजपूत व उपसभापतिपदी सुनील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ हे २०२८ पर्यंत कार्यरत असून, बाजार समितीचे विद्यमान सभापती दीपक मराठे व उपसभापती विजय पाटील यांनी आपल्या पदाच्या राजीनामा दिल्याने जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशान्वये सोमवारी (ता. २२) बाजार समितीच्या सभागृहात निवडणूकप्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धीरज चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना सचिव योगेश अमृतकर, सहायक निबंधक आर. आर. राठोड यांनी सहकार्य केले.
या वेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपसभापती मनोज रघुवंशी यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला. याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. ठाणसिंग राजपूत व सुनील पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी चौधरी यांनी केली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सूचनेनुसार ठाणसिंग राजपूत यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आमदार रघुवंशी यांनी नवनिर्वाचितांचे स्वागत केले आहे. सभापती व उपसभापती यांनी सोमवारीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.