22254
दक्षिण आफ्रिकाः कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळविल्यानंतर विद्यापीठाचा झेंडा फडकविणारे डॉ. गोपाळ शिंदे
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. गोपाळ शिंदेंचे यश
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये फडकविला झेंडा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात जुन्या आणि धावपटूंसाठी कठीण असलेल्या कॉम्रेड्स मॅरेथॅान २०२६’मध्ये डॉ. गोपाळ शिंदे यांनी यश मिळविले आहे. डर्बन ते पीटरमॅरिट् झबर्ग यादरम्यानची ८६ किलोमीटर अंतराची आव्हानात्मक १२ तासात पूर्ण करण्याची अट असतांना, त्यांनी हे अंतर ११ तास २८ मिनिटात यशस्वीरीत्या पूर्ण केली. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च येथील अस्थिरोग विभागाचे विभागप्रमुख आहेत.
या स्पर्धेत जगभरातून २२ हजारापेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी भारतातून २८९ धावपटू पात्र ठरले होते. स्पर्धेत पात्र होण्यासाठी अलीकडील वर्षी कोणत्याही जागतिक मान्यताप्राप्त मॅरेथॉनमध्ये पाच तासांपेक्षा कमी वेळात अंतर पूर्ण करणे बंधनकारक होते. डॉ. गोपाळ शिंदे, यांनी टाटा मुंबई मॅरेथॅान २०२६ मध्ये ४ तास ३० मिनिटे आणि ६ सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवून या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
डॉ. गोपाळ शिंदे उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभारी कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे यांनी अभिनंदन केले आहे.
-------
असा केला सराव
डॉ. गोपाळ शिंदे यांनी स्पर्धेची कौशल्यपूर्ण संपूर्ण तयारी केली होती. विद्यापीठाची १० किलोमीटर मॅरेथॅान, हाफ मॅरेथॅान आणि त्यानंतर ५०, ५६ व ६५ किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॅान यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी आपला टप्पा गाठला. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान दर महिन्याला दीडशे ते दोनशे किलोमीटर, तर जानेवारी ते मे दरम्यान दर महिन्याला तब्बल ३०० किलोमीटर धावण्याचा सराव केला. यासोबतच दररोज पहाटे ते धावण्याचा सराव करत. धावण्यासोबतच दर आठवड्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग, सायकलिंग आणि पोहण्याचा सरावही त्यांनी सुरु ठेवला होता.
हा प्रवास खडतर होता. पण इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले. मला या संपूर्ण प्रवासात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि एमपीजीआयएमईआरचे सहकार्य व पाठिंबा लाभला.
डॉ. गोपाळ शिंदे