NSK26H22257
जळगाव : कंडारी (ता. जळगाव) गावात भेटीदरम्यान अंगणवाडीत पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर.
–––
ग्रामपंचायतीमधील दाखल्यांच्या सेवांचा आढावा
(उपशीर्षक)
सीईओ नायर यांची कंडारी येथे भेट; शाळा, अंगणवाडीच्या सुविधांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : ग्रामपंचायतीमार्फत गावात वेगवेगळे दाखले उपलब्ध करून दिले जात आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात महाऑनलाइनद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांच्या सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना आवश्यक दाखले व सेवा वेळेत, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज (ता. २२) जळगाव तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीस भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्रातील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भेटीदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
पोषण आहाराची घेतली माहिती
अंगणवाडी केंद्रात जात बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची माहिती घेतली. पोषण आहाराची गुणवत्ता, नियमित वितरण तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. ग्रामपंचायतीच्या गाव नमुना क्रमांक ८ व ९ या नोंदींचीही पाहणी करण्यात आली.