NSK26H22274
नंदुरबार : जप्त केलेल्या दुचाकींबरोबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिस निरीक्षक हेमंत पाटील.
---
दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात
---
७ लाख ५० हजार रुपयांच्या २१ दुचाकी जप्त
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २२ : दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपयांच्या २१ दुचाकी जप्त केल्या आहेत. टोळीकडून नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
म्हसावद ते राणीपूर रोडवर दोन अनोळखी व्यक्ती विना क्रमांकाच्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळाली. त्यावरून त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सुरेश संतोष मुखडे (वय २०, रा. राखी, ता. पानसेमल जि. बडवाणी), सुनील भाबल्या वळवी (२०, चार्लीफाटा, ता. पानसेमल) यांना रिद्धी-सिध्दी गणपती मंदिराजवळ पथकाने ताब्यात चौकशी केली. त्यांनी दुचाकी धडगाव येथून चोरी केल्याची संशयितांनी कबुली दिली. संशयितांनी गुलाबसिंग ऊर्फ गुलच्या इसमा वळवी (रा. चार्लीफाटा) त्यांचा आणखी एक साथीदाराच्या मदतीने नंदुरबार जिल्हा तसेच, मध्य प्रदेश व गुजरात राज्यात दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्या दुचाकी त्यांच्या गावी लपवून ठेवल्याची कबुली दिली. पथकाने गुलाबसिंग वळवी यास ताब्यात घेऊन चारही संशयितांनी लपविल्या सात लाख ३० हजार रुपयांच्या २१ दुचाकी हस्तगत केल्या. संशयितांवर नंदुरबार शहर, नंदुरबार उपनगर, शहादा पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
पथकाला नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. पुणे येथील २, गुजरात राज्यातील ६ व मध्यप्रदेश राज्यातील ३ व उत्तर प्रदेशातील १, असा एकूण १८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. उर्वरित तीन दुचाकींच्या मुळ मालकांचा शोध सुरू आहे.
पोलिस अधिक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर अधिक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार सजन वाघ, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, अंमलदार यशोदीप ओगले, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांनी ही कामगिरी केली.