लोगो : विधान परिषद निवडणूक
दराडेंच्या पराभवानंतर महायुतीत धुमशान
फुटीर मतांची भाजप-शिवसेनेकडून चौकशी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. ६१९ पैकी ४६६ मते असूनही शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असून, तब्बल २१८ मतांची फूट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतफुटीची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा भाजप आणि शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
निकालानुसार अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना ३५७ मते मिळाली, तर दराडे यांना केवळ २४८ मतांवर समाधान मानावे लागले. विजयासाठी ३१० मतांची गरज असताना दराडे १०९ मतांनी पिछाडीवर राहिले. महायुतीकडे भाजपचे १९०, शिवसेनेचे १७१ आणि राष्ट्रवादीचे १०७ असे एकूण ४६६ मतदार होते. मात्र प्रत्यक्ष मतदानात त्यांपैकी २१८ मते दुसरीकडे वळल्याने महायुतीचा अंदाज चुकला.
‘कोण विरोधात गेले, याचा अहवाल शिंदेंना पाठवणार’
पराभवानंतर शिवसेनेचे नाशिकचे संपर्कमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा पराभव नेमका कशामुळे झाला, त्यामध्ये कोण सामील होते, याचा आम्ही एक अहवाल तयार करू आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवणार, असे सामंत म्हणाले.
ते म्हणाले, की आमच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांची गोळाबेरीज कमी पडली. ती कशी कमी पडली याचे विश्लेषण केले जाणार आहे.
दरम्यान, महायुतीचा हा पराभव केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता राज्यातील महायुतीच्या अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. चौकशीतून मतफुटीमागील नेमकी कारणे आणि जबाबदार कोण, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वेगळ्या निकालाची चौकशी
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी निकालाला धक्कादायक म्हटले आहे. नाशिकचा निकाल धक्कादायक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले. तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. महायुतीची जवळपास पावणेपाचशे मते होती. तरीदेखील महायुतीच्या उमेदवाराला इतकी कमी मते पडली, याचे कारण शोधण्याची आवश्यकता आहे, असे महाजन म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले, की ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. हे का झाले आणि कशामुळे झाले, कोण आमच्या बाजूने उभे राहिले नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे. निश्चितच याबाबत चौकशी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
-------------------
महायुतीचे नेते कोण?
महाजन यांनी दराडे यांनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. नरेंद्र दराडेंनी काय आरोप केले ते मी बघितले, त्यांनी माझंदेखील नाव घेतले आहे. सध्या ते हरले असल्यामुळे वेगळ्या मनःस्थितीत आहेत. पण त्यांनाही कल्पना आहे, एकनाथ शिंदेंना माहीत आहे आणि उदय सामंत यांनादेखील माहीत आहे की आम्ही किती प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. महायुतीचे तीन नेते कोण, दराडेंनी जाहीर करावे, उदय सामंत यांनी दराडे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत म्हटले, महायुतीचे ते तीन नेते नेमके कोण हे दराडेंनी जाहीर करावे. गिरीश महाजन, दादा भुसे आणि आपण स्वतः नरेंद्र दराडे यांच्यासाठी प्रयत्न केले. आता हा पराभव का झाला याचे विश्लेषण करू. गिरीश महाजन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. मी असा माणूस नाही, ओठात एक आणि पोटात एक असा माझा स्वभाव नाही. पण दुर्दैवाने आमचा पराभव झालेला आहे. हा आम्हाला मोठा धक्का आहे, याची आम्ही चौकशी करू, असे ते म्हणाले.