दराडे बंधुंची आगपाखड

दराडे बंधुंची आगपाखड
Published on
महायुतीत ‘पाठीत खंजीर’चा आरोप पराभवानंतर दराडे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभवानंतर महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. पराभवासाठी महायुतीतील काही नेत्यांना जबाबदार धरत दराडे बंधूंनी थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत नरेंद्र दराडे यांनी ‘विश्वासात न घेता दुसऱ्या उमेदवाराला बळ देण्यात आले,’ असा दावा केला, तर आमदार किशोर दराडे यांनी ‘व्यासपीठावर पाठिंबा आणि प्रत्यक्षात विश्वासघात’ झाल्याचा आरोप करत महायुतीतील नाराजीला वाचा फोडली. नरेंद्र दराडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला आश्वासने देत माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार आणि मतांच्या व्यवस्थापनाबाबतही संशयास्पद घडामोडी झाल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेतील वरिष्ठ मंत्री आपल्या पाठीशी ठाम उभे होते, मात्र स्थानिक पातळीवर वेगळीच भूमिका घेतली गेली, असा त्यांचा दावा होता. दरम्यान, आमदार किशोर दराडे यांनीही महायुतीतील सहकारी पक्षांवर तीव्र शब्दांत टीका केली. ‘ही निवडणूक महायुतीची होतीच नाही. मंचावर पाठिंबा दाखवला गेला; पण मतदानाच्या वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला,’ असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दराडे बंधूंच्या या आरोपांमुळे नाशिकच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीतील मतफुटी, क्रॉस व्होटिंग आणि अंतर्गत नाराजी यांचा परिणाम पराभवावर झाला का, याची चर्चा आता महायुतीतच सुरू झाली आहे. पराभवाची कारणे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र पातळीवर आढावा घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमधील या निकालाने महायुतीतील समन्वय आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेद पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com