आर्द्रा नक्षत्रात प्रतीक्षा संपली, सुखद सरी बरसल्‍या

आर्द्रा नक्षत्रात प्रतीक्षा संपली, सुखद सरी बरसल्‍या
Published on
आर्द्रेच्या पहिल्याच सरींचा दुहेरी परिणाम --- मॉन्सूनचे आगमन; उकाड्यापासून मुक्तता, तर विजेच्या तडाख्यात तीन गायी दगावल्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : मृग नक्षत्रात पाठ फिरवलेल्या मॉन्सूनने अखेर आर्द्रा नक्षत्रात नाशिक जिल्ह्यात प्रवेश करीत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. मात्र, पहिल्याच पावसाने दिलाशाबरोबर नुकसानाचीही चाहूल दिली. निफाड आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात विजेच्या तडाख्यात तीन गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनाचा आनंद आणि नुकसानीची वेदना असा दुहेरी अनुभव सोमवारी (ता. २२) जिल्हावासीयांनी घेतला. तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांसाठी सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने आशेचे संकेत दिले. दुपारनंतर शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, सिडको, इंदिरानगर, सातपूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. काही भागांत अल्पकाळ जोरदार पाऊसही झाला. त्यामुळे तापमानात घट होऊन उकाड्याची तीव्रता कमी झाली. पावसामुळे रस्त्यांवर धावपळ करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला; तर शेतकऱ्यांमध्येही खरीप हंगामाबाबत नव्याने आशा निर्माण झाली. अजूनही अनेक तालुक्यांची प्रतीक्षा कायम नाशिक शहरासह इगतपुरी, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, बागलाण, येवला, निफाड, देवळा, सिन्नर आणि चांदवड तालुक्यांत पावसाच्या सरी बरसल्या असल्या, तरी जिल्ह्यातील अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः कळवण, सुरगाणा आणि पेठ तालुक्यांत ढगाळ वातावरण असूनही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आकाशाकडे लागून आहेत. गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी गुरुवार (ता. २५)पर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. चौकट आर्द्रेची सर... आशेची नांदी मृग नक्षत्र कोरडे गेल्यावर आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे. धरण क्षेत्रात आणि ग्रामीण भागात पुढील काही दिवस चांगला पाऊस झाल्यास पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पेरण्यांनाही गती मिळेल. चौकट जिल्ह्यात तीन गायींचा मृत्‍यू पिंपळगाव (ता. निफाड) येथील प्रसाद भोर यांच्या दोन गायी सोमवारी वीज पडून मृत झाल्‍या. मौजे पिंप्री (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील धोंडीराम मुरलीधर पारधी यांच्‍या गायीचा वीज पडून मृत्‍यू झाल्‍याची नोंद जिल्‍हा प्रशासनाने घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com