टूडे साठी
---------------
मुंबई नाका ते त्र्यंबक नाका मार्ग काँक्रीटचा होणार
सिमेंट काँक्रीटसह भुयारी सुविधा; पाणी निचऱ्याची कामे वेगात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई नाका-गडकरी चौक-त्र्यंबक नाका मार्ग आता नव्या स्वरूपात विकसित होत आहे. पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असा हा मार्ग नाशिककरांच्या सोयीचा ठरणार असून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कामांना गती दिली आहे.
नाशिक पश्चिम विभागांतर्गत सुमारे १ हजार १४० मीटर लांबीचा हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. रस्त्यासोबतच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन महापालिकेने घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायू वाहिनी, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, विद्युत यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर केबल यांची कामे एकाच वेळी हाती घेतली आहेत. सध्या या मार्गावर सुमारे ५० मीटर लांबीची नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. महापालिकेच्या विद्युत यंत्रणा आणि ८०५ मीटर लांबीची ऑप्टिकल फायबर केबलची कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे १ हजार १४० मीटर लांबीच्या पावसाळी पाणी निचरा वाहिनी आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही वेगाने सुरू आहे.
मुंबई नाका, गडकरी चौक आणि त्र्यंबक नाका हे नाशिकमधील प्रमुख वाहतूक केंद्र आहेत. सिंहस्थासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास सुरक्षित, जलद आणि अधिक सोईस्कर व्हावा, यासाठी सर्व मूलभूत सुविधा एकत्रितपणे उभारल्या जात आहेत. हा मार्ग केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर भविष्यातील नागरी गरजांसाठीही सज्ज केला जात आहे. पायाभूत सुविधांनी परिपूर्ण झालेल्या या मार्गाचा थेट फायदा नाशिककरांना होईल, असे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. महापालिकेच्या मते, सिंहस्थापूर्वी शहरातील महत्त्वाच्या मार्गांची सज्जता पूर्ण करण्यावर भर असून, मुंबई नाका ते त्र्यंबक नाका मार्ग त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे.