धुळे : टुडे पान १ साठी..अँकर
--
फोटो : धुळे जिल्हा परिषद इमारत लोगो वापरणे.
--
जिल्ह्यातील ३९ शिक्षकांची केंद्रप्रमुखांसाठी निवड!
--
जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण ; लवकरच मिळणार नियुक्ती आदेश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे सनियंत्रण आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिक्त समूह साधनकेंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदांची भरती प्रक्रिया अखेर पूर्ण झाली. सोमवारी (ता. २२) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात यासाठीची विशेष समुपदेशन प्रक्रिया पार पडली. विभागीय स्पर्धा परीक्षेंतर्गत पात्र ठरलेल्या शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार (मेरिट) आणि त्यांच्याच मागणीनुसार इच्छित स्थळी पदस्थापना देण्यात आली आहे.
-
सदर समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार, जिल्ह्यातील चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी ज्योती पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बबिता पटले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी लक्ष्मीकांत वाघ आणि वरिष्ठ सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते. या समुपदेशन प्रक्रियेसाठी ५६ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. जिल्ह्यातील रिक्त ४१ जागांसाठी ही प्रक्रिया झाली. मात्र अंतिम पडताळणी दरम्यान दोन उमेदवार अपात्र ठरल्यामुळे प्रत्यक्ष ३९ जागांसाठीच समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात आली. यात मराठी माध्यमासाठी ३८ तर उर्दू माध्यमासाठी एका शिक्षकाची अंतिम निवड करण्यात आली. या प्रक्रियेत तालुक्यातील रिक्त जागांनुसार शिक्षकांची निवड करण्यात आली. यात साक्री तालुक्यात सर्वाधिक १३, शिरपूर तालुक्यात १०, धुळे तालुक्यात नऊ तर शिंदखेडा तालुक्यात सहा मराठी माध्यमाच्या शिक्षकांची तर उर्दू माध्यमाच्या एका शिक्षकाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व शिक्षकांना उर्वरित तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या एक ते दोन दिवसांत त्यांचे अधिकृत नियुक्ती आदेश वितरित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.