नाशिकमधील दगाफटक्याने जळगावात महायुतीत ‘फटाके’
उपशीर्षक
युती धर्म पाळला : शिवसेना; गितेंच्या मतांची चौकशी : भाजप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीत जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. दुसरीकडे, नाशिकला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होऊन भारतीय जनता पक्ष बंडखोर गोकुळ गिते यांचा विजय झाला. नाशिकला भाजपने दगाफटका केला, आम्ही मात्र युतीधर्म निभावला, असा दावा सेनेने केला; तर गितेंना मिळालेल्या मतांची चौकशी करावी लागेल, असे भाजपने म्हटले आहे.
एकंदरीत नाशिकच्या निकालाने जळगावात महायुतीत बेबनाव निर्माण झाला असून, येणाऱ्या काळात हे वितुष्ट आणखी वाढत जाण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तवली जाते.
विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. २२) जाहीर झाला. जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची भरभरून ५८२ मते मिळाली. नाशिकला मात्र बंडखोर उमेदवार गोकुळ गिते निवडून आले. तेथे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला. दराडेंनी त्याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला. मात्र, नाशिकच्या निकालाने जळगावात महायुतीत कमालीचा बेबनाव निर्माण झाला आहे.
----
NSK26H22277 : विष्णू भंगाळे
कोट
नाशिकला माघार झाल्यावर जळगावात आमच्या उमेदवाराने नंदू महाजनांना पाठिंबा दिला. शिवसेनेने सर्वच्या सर्व पहिल्या पसंतीची मते भाजप उमेदवाराला देत युतीधर्म पाळला. नाशिकला मात्र आमच्या उमेदवाराचा घात झाला.
- विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
-----
NSK26H22276 (किशोर पाटील)
उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जळगावात माघार घेण्याबाबत आम्हाला दम भरला. आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करीत शिवसेनेची सर्व पहिल्या पसंतीची मते भाजप उमेदवाराच्या मागे उभी केली. अगदी दुसरा पसंतीक्रमही आम्ही टाकला नाही. नाशिकला मात्र आमचे उमेदवार तब्बल ७५ मतांनी पराभूत झाले, याचा अर्थ काय?
- किशोर पाटील, आमदार, पाचोरा
----
NSK26H22278
नाशिकला शिवसेनेच्या उमेदवाराबद्दलच स्थानिक नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता, अशी माहिती आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनीच गितेंना निवडून दिले. भाजपची मते फुटली, असे म्हणता येणार नाही. गितेंना मिळालेल्या मतांची चौकशी झाली पाहिजे, म्हणजे कुणी मते दिली ते समजेल.
- डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप (पश्चिम)