NSK26H22282
खांडबारा : पावसामुळे गल्लीत साचलेले पाणी.
----
नंदुरबारात रिमझिम पाऊस
नंदुरबार : शहरासह जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी रिमझिम पाऊस झाला. या जलधारांनी वातावरणात गारवा निर्माण झाला. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. नंदुरबार शहर आणि परिसरात सोमवारी सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. शहरात सकाळी नऊच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाच ते दहा मिनिटे झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. काही दिवसांपासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, या पावसामुळे तापमानात घट झाली व आल्हाददायक गारवा पसरला. रिमझिम पावसाने बळीराजाच्या आशा झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असून, त्यानंतरच खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग येईल.
तोरणमाळला पावसाची हजेरी
तोरणमाळ आणि म्हसावद परिसरात सोमवारी रिमझिम पाऊस झाला. येथे चार दिवसांत दोनवेळा जलधारा कोसळल्या. मात्र, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जोरदार पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग कायम आहेत. याबाबत तोरमाळचे शेतकरी अजय पटले म्हणाले, की जमिनीची तहान पूर्ण करणारा पाऊस हवा. हलक्या सरींनी फक्त वातावरणात गारवा निर्माण होतो. आम्ही शेत तयार करून ठेवले आहे. मात्र, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे जोखमीचे ठरेल. कमी ओलाव्यात पेरणी केली आणि पुन्हा पावसाने ओढ दिली, तर बियाणे वाया जाण्याची भीती आहे. आता केवळ दमदार पावसाची वाट पाहत आहोत.
खांडबारा परिसरात पाऊस
खांडबारा : नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात सोमवारी सकाळी पावसाने १५ मिनिटे हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पहिल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. बालगोपालांनीही पावसात भिजत आनंद लुटला. पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसाच्या हजेरीने वातावरणात बदल जाणवू लागला आहे. मात्र, शेतकरी वर्गाची चिंता अद्याप कायम आहे. पेरणीलायक पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडली आहे. पहिल्या पावसाने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी खांडबारा परिसरातील शेतकरी आणि नागरिक जोरदार व समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.