धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
महसूल पथकाला चकवा;
वाळूचे ट्रॅक्टर पळविले
धुळे : नवलनगर ते वणी (ता. धुळे) गावादरम्यान महसूल विभागाच्या पथकाला चकवा देत वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली. महसूल विभागाचे कर्मचारी अनिकेत पाटील यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात संशयित भूषण माळी (रा. आर्णी, ता. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वीस जूनला सकाळी साडेनऊच्या सुमारास नवलनगर- वणी मार्गावरील फार्मसी कॉलेज परिसरात महसूल पथकाने वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच १८ झेड ९४१५) अडविले. तपासणीत विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पंचनामा करून वाहन पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे नेत असताना बाळापूर शिवारातील राज्य महामार्गावर चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने वळवून वाळूसह पळ काढला. या प्रकरणात ट्रॅक्टर व वाळू, असा एकूण दोन लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट असल्याचे पोलिसांत नमूद आहे.
-
शाळेची बदनामी;
संशयितावर गुन्हा
धुळे : म्हसदी (ता. साक्री) येथील शाळेची संवेदनशील माहिती व सीसीटीव्ही चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गंगामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व. न. देवरे यांच्या फिर्यादीनुसार विजय भिलाजी अहिरे (रा. म्हसदी, ता. साक्री) याने शाळेतील संवेदनशील माहिती, सीसीटीव्ही चित्रफीत व अन्य साहित्य स्वतःकडे ठेऊन २०२२ ते २०२३ दरम्यान विविध माध्यमांत प्रसारित केल्याचा आरोप आहे. तसेच शाळा, मुख्याध्यापिका व शिक्षकांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.
-
दोन गटांत मारहाण;
आठ जणांवर गुन्हे
धुळे : देगाव (ता. साक्री) येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या मारहाणीप्रकरणी आठ जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. भरत साहेबराव सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब दाजमल सोनवणे, आनंद दाजमल सोनवणे, सुभाष शिवाजी माळी, दादा सुभाष माळी व पिंट्या दाजमल सोनवणे यांनी लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली. सुभाष शिवाजी माळी यांच्या फिर्यादीनुसार संजय साहेबराव सोनवणे, भरत साहेबराव सोनवणे व अजय संजय सोनवणे यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावरून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
-
अल्पवयीन मुलीला
फूस लावून पळवून
धुळे : नवापाडा (ता. साक्री) येथील शिवारातील शेतातील घरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कुटुंबातील सदस्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई झाली. १८ जूनला सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित मुलगी शेतातील घरातून निघून गेल्यानंतर तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
गोमांस विक्री;
एकाविरुद्ध गुन्हा
धुळे : शहरातील गफूरनगर भागात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी कारवाई केली. यात ४५ किलो गोमांस, लोखंडी वजनकाटा व सुरा, असा आठ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सूर्यकांत भामरे यांच्या फिर्यादीनुसार संशयित निहाल अहमद उस्मान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-