NSK26H22281
नंदुरबार ः एस.टी. आगारात आंदोलन करताना कर्मचारी.
---
एसटी कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी आंदोलन
राज्यातील १७ संघटनांतर्फे कृती समितीची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २३ : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी येथे आंदोलन केले. बारा वर्षांपासून वेतन आणि भत्त्यांचा फरक मिळालेला नसल्याने राज्यातील कृती समितीच्या वतीने आंदोलन पुकारले होते. विविध १७ संघटना या आंदोलनात एकवटल्या होत्या. येत्या सोमवारपर्यंत शासनाने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा, लालपरीसह चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
नंदुरबार आगारात सोमवारी (ता. २२) एसटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी कर्मचारी लढा देत आहेत, मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी कृती समितीने दिला. वेतनातील फरक, एक टक्के पगारवाढीची थकबाकी, घरभाडे भत्ता, तसेच २०२० पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी अद्यापही मिळालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सरकारकडे आमच्या हक्काची रक्कम प्रलंबित असून, ती तातडीने देण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. राज्यातील १७ संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली असून, शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या सोमवार (ता. २९)पासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.