धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 22280
साक्री : म्हशी चोरल्या प्रकरणी ताब्यातील संशयितासह उपस्थित एलसीबीचे पथक.
-
पशुधन चोरी; टोळीचा पर्दाफाश
-
पंधरा लाखांचा माल हस्तगत; चार गुन्हेही उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने साक्री आणि पिंपळनेर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा पशुधन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका सराईत संशयिताला गजाआड करण्यात आले असून, त्याच्याकडून ९ म्हशी, २ पारडू आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे साक्री व पिंपळनेर परिसरातील पशुधन चोरीचे तीन आणि वाहन चोरीचा एक, असे एकूण चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षकांकडून एलसीबीचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आले. साक्री, पिंपळनेर व निजामपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हे पथक गस्त घालत असताना साक्री- नवापूर रस्त्यावरील एका पानटपरीजवळ संशयित व्यक्ती येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
-
गुन्हेगाराची कबुली
पोलिसांनी सापळा रचून संशयित सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावित (वय ३२, रा. सारवाट, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार प्रभू होड्या गावित (रा. उची शेवडी, ता. नवापूर), योहान जनू गावित (रा. ओंटीपाडा, विसरवाडी, ता. नवापूर) आणि रवी गावित (रा. रायपूर, ता. नवापूर) यांच्या मदतीने साक्री व पिंपळनेर परिसरातून चारचाकी वाहनाचा वापर करून पशुधन चोरी केल्याची कबुली दिली. संशयिताच्या निशानदेहीवरून साक्री- नवापूर मार्गालगतच्या जंगल परिसरातून चोरी केलेले पशुधन आणि वाहन जप्त करण्यात आले. अन्य तीन संशयितांचा शोध घेतला जात आहे.
-
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी सात जाफराबादी म्हशी, दोन मुरा जातीच्या म्हशी, दोन पारडू व चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन (एमएच १८ एए २३७६), असा मुद्देमाल जप्त केला. या टोळीतील मुख्य संशयित सुरेश गावित आणि प्रभू गावित याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांत चोरीचे तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई निरीक्षक वारे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी, योगेश जगताप, अमोल पाटील, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.
-