22295
नाशिक : पारेगाव घटनेतील दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांना देताना महसुल अधिकारी.
अधिकारी मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाई करावी
तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आक्रमक; निवेदनाद्वारे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : पारेगाव (ता.येवला) येथे अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांवरील कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे महसुल अधिकाऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पारेगावमधील तळ्यात शनिवारी (ता., २०) बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन सुुरु होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे हे ग्राममहसूल अधिकारी संतोष आठवले व वाहनचालक वैभव भड यांच्यासह घटनास्थळी पोहोचले होते. सदर ठिकाणी मुरूम उत्खनन करणारा डंपर चालक व संबंधितांकडे परवान्याची मागणी केली असता, त्यांनी महसुल प्रशासनाशी हुज्जत घातली. निवासी नायब तहसीलदार नेवसे यांना बेदम मारहाण करून त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. निवेदन देतेवेळी उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, तहसीलदार पंकज पवार, आबासाहेब तांबे, प्रदीप वर्पे, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप, प्रियांका पाचारणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
---
मनोधैर्य खच्चीकरण
महसुल अधिकाऱ्यांवर दिवसाढवळ्या होणारे हल्ले जीवघेणे असून महसुल प्रशासनाचे मनोधैर्य खचत आहे. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे काम कसे करावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या सर्व प्रकरणात मुख्य सूत्रधार व संशयितांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.