गोकुळ गितेंनी घेतली आमदारकीची शपथ
सभागृहात फडणवीसांची मिश्कील टिप्पणी; नाशिकमध्ये समर्थकांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : विधान परिषदेच्या सभागृहात मंगळवारी दुपारची वेळ. एकामागून एक नवनिर्वाचित सदस्य शपथ घेत होते. त्याच वेळी नाव पुकारले गेले ‘गोकुळ सुनीता बबन गिते...’ आणि नाशिकच्या राजकारणातील नव्या अध्यायाला अधिकृत सुरुवात झाली.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विजयी झालेले गोकुळ गिते यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून ईश्वरसाक्ष शपथ घेतली. भारताच्या संविधानाविषयी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगण्याची, देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता जपण्याची, तसेच आपल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडण्याची प्रतिज्ञा त्यांनी सभागृहात केली. शपथ पूर्ण होताच त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय’ असा जयघोष केला आणि सभागृह दणाणून गेले.
मात्र त्यानंतर घडलेल्या एका प्रसंगाने वातावरणात हलकाफुलका रंग भरला. सभागृहातून कोणीतरी ‘जय गिरीश महाजन’ अशी घोषणा दिली. अचानक झालेल्या या घोषणेमुळे सदस्यांमध्ये हशा पिकला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी साधत, ‘अन् ऑफिशियल काही केलं असेल तर सांगून द्या, आता काही राहिलं नाही,’ अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात पुन्हा एकदा जोरदार हास्याची लाट उसळली.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यातील १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतून निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी पार पडला. त्यामध्ये गोकुळ गिते यांचाही समावेश होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गिते यांचे कुटुंबीयही सभागृहात उपस्थित होते. मातोश्री सुनीता गिते, पत्नी उज्ज्वला गिते, बंधू गणेश गिते, भावजय व नगरसेविका दीपाली गिते तसेच मित्रपरिवाराने हा सोहळा जवळून अनुभवला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा १०९ मतांनी पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडविली होती. निकालानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करण्याची भूमिका जाहीर केली होती.
आता विधिमंडळात अधिकृत शपथ घेतल्यानंतर गोकुळ गिते यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाले असून, नाशिकच्या राजकारणातील त्यांच्या नव्या इनिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.