निवृत्ती वेतनधारकांसाठी
मोबाईल ॲपद्वारे सुविधा
नंदुरबार, ता. २३ : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयामार्फत निवृत्त वेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली.
अॅपच्या माध्यमातून निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतनाशी संबंधित अनेक सुविधा मोबाईलवरच मिळणार आहेत. अॅपचा वापर करण्यासाठी निवृत्तिवेतनधारकांकडे पेन्शन वाहिनी पोर्टलवरील लॉगिन, पीपीओ क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि वैध लॉगिन क्रेडेन्शियल्स असणे आवश्यक आहे. अॅपच्या पहिल्या टप्प्यात मासिक निवृत्तिवेतन देयक इतिहास उत्पन्न प्रमाणपत्र, ई-पीपीओ लायब्ररी, फॉर्म क्रमांक १६, निवृत्तिवेतनविषयक शासन निर्णय, तसेच नवीन घोषणा या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवृत्तिवेतनधारकांना मासिक निवृत्तिवेतनाचा तपशील पाहता येणार आहेत. तसेच उत्पन्न प्रमाणपत्र, फॉर्म क्र. १६ आणि पीपीओ, सीपीओ, जीपीओ यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. अॅपमध्ये शासनाच्या नवीन सूचना व अद्ययावत माहिती नियमितपणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.