अँकर
---
NSK26H22327
नंदुरबार : कार्यशाळेत सहभागी झालेले नंदुरबार जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षक.
---
शिर्डीत २६१ संगणक प्रशिक्षकांची कार्यशाळा उत्साहात
आयसीटी प्रयोगशाळा व्यवस्थापन व डिजिटल शिक्षणाबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २३ : नाशिक विभागातील २६१ संगणक प्रशिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा शिर्डी येथे उत्साहात पार पडली. आयसीटी (माहिती व संवाद तंत्रज्ञान) संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन आणि डिजिटल शिक्षण या विषयांवर या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षकांनीही या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील संगणक प्रशिक्षकांसाठी आयोजित या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संगणक हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे, डिजिटल तंत्रज्ञानाविषयीची भीती दूर करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सक्षम बनविणे हा होता. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत नाशिक विभागातील ४७२ शाळा व गटसाधन केंद्रांमध्ये संगणक प्रयोगशाळांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संगणक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यशाळेत प्रशिक्षकांना अद्ययावत तांत्रिक ज्ञान, प्रयोगशाळा व्यवस्थापन, शैक्षणिक नियोजन, तसेच डिजिटल शिक्षण पद्धतींबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक विभागप्रमुख अजित धसाडे, प्रकल्पप्रमुख मनोज सिंह, हीना कोसार, विभागीय एमआयएस समन्वयक पूनम वाघमारे, नंदुरबार जिल्हा समन्वयक दीपक पाठक आदी उपस्थित होते. या वेळी संगणक शिक्षणाचे महत्त्व, डिजिटल साक्षरता, आयसीटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात तंत्रज्ञानाची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे संगणक प्रशिक्षकांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळाली असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.